पुणे / प्रतिनिधी :
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 17 मार्चपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचना, कागदपत्रांची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यता, शाळा, खासगी विनाअनुदानित व खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे. आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर पालकांना प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिक वाचा : NDA मध्ये नोकरी, वर्क टेंडरच्या आमिषाने 28 लाखांचा गंडा
आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. पालकांनी प्रवेशासाठी 10 शाळांची काळजीपूर्वक निवड करायची आहे. पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे आहे. प्रवेशप्रक्रियेबाबत काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवरती मदत केंद्राची माहिती देण्यात आली आहे. पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक व खरी माहिती भरावी. एकदा प्रवेश घेतलेल्या बालकास पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही. चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास तो प्रवेश रद्द करण्यात येणार आहे. तसेच एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास तो अर्ज सोडतीसाठी विचारात घेतला जाणार नाही, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केल्या आहेत.
आवश्यक कागदपत्रे
निवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, सामाजिक वंचित जात संवर्गातील असल्यास त्याचे प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा, आधारकार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती त्याचप्रमाणे अनाथ बालके, कोविड प्रभावित बालके, एचआयव्ही बाधित बालके, न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटातील पालकांची बालके, विधवा महिलांची मुले यांकरिता कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे.