कधीकाळी हेते जैविक अस्त्रांचे चाचणी केंद्र
जगात अशा अनेक जागा आहेत, ज्या अत्यंत धोकादायक आणि घातक आहेत. अशीच एक जागा उझ्बेकिस्तानात आहे. या ठिकाणी कधीकाळी जैविक अस्त्रांचे चाचणी केंद्र होते. परंतु आता तेथे माणसांचे अस्तित्वच दिसून येत नाही. 1920 मध्ये सोव्हियत महासंघाने विध्वंसक अस्त्रांचे परीक्षण करता येईल अशा ठिकाणाचा शोध चालविला होता. सोव्हियत महासंघाला उझ्बेकिस्ताननजीक एरल समुद्रातील वोझ्रोझेडेनिया हे बेट याकरता पसंत पडले, ज्यानंतर हे ठिकाण जगातील सर्वात मोठय़ा जैविक अस्त्रांचे वॉरफेयर म्हणून प्रसिद्ध झाले.
सोव्हियत महासंघाने 1948 मध्ये जैविक अस्त्रांची निर्मिती आणि त्याचे परीक्षण करण्यासाठी एक गुप्त प्रयोगशाळा स्थापन केली, ज्याला एरलसक-7 असे म्हटले गेले. 1990 मध्ये ही प्रयोगशाळा बंद करण्यापूर्वी येथे अनेक प्रकारचे आजार आणि जैविक अस्त्रांवर संशोधन करण्यात आले. यातील अनेक आजार जीवघेणे होते, यात प्लेग, अँथेक्स, स्मॉलपॉक्स, ब्रूसेलॉसिस, तुलारेमिया, बॉटय़ुलिनम, एंनसेफिलाइटिस इत्यादींचा समावेश होता.
माकडांवर व्हायचा प्रयोग
या प्रयोगशाळेत 18 वर्षांपर्यंत काम केलेले सोव्हियत सैन्याचे निवृत्त कर्नल आणि मायक्रोबायोलॉजिस्ट गेनाडी लेपायोशकिन यांनी याबद्दल खुलासा केला होता. दरवर्षी तेथे विविध जैविक अस्त्रांचे 200-300 माकडांवर परीक्षण केले जायचे. या प्रयोगामुळे काही आठवडय़ातच सर्व माकडं मरून जायची.
जगातील सर्वात घातक ठिकाण
कालौघात सर्व जैविक अस्त्रs नष्ट करण्यात आली असली तरीही अँथेक्स अनेक शतकापर्यंत मातीत तग धरून राहतो. तेथील भूमीत आजही अँथ्रेक्स मोठय़ा प्रमाणात असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे. कुठलाही माणूस तेथे गेल्यास त्याचा मृत्यू निश्चित आहे. आता एरल समुद्र पूर्ण आटला असून हे ठिकाण वाळवंटात रुपांतरित झाले आहे. येथील तापमान 60 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने तेथे कुणी जिवंत राहणे अशक्यच आहे.