अनेक दिवसांपासून होती आजारी ः नामीबियातून आणलेल्या चित्त्यांपैकी एक
वृत्तसंस्था / श्योपूर
देशात चित्त्यांचे अस्तित्व पुन्हा निर्माण करण्याच्या मोहिमेला मोठा झटका बसला आहे. मध्यप्रदेशच्या श्योपूर कुनोमध्ये सोमवारी एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. नामीबियातून आणलेली मादी चित्ता अनेक दिवसांपासून आजारी होती. साशा चित्त्याचा किडनी आजारामुळे सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे.
आफ्रिकेतून दोन तुकडय़ांमध्ये चित्ते भारतात आणले गेले होते. मागील वर्षी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी नामीबियातून चित्त्यांची पहिली तुकडी भारतात पोहोचली होती. या तुकडीत साशा समवेत 8 चित्त्यांचा समावेश होता आणि त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते. यानंतर फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांची दुसरी तुकडी भारतात दाखल झाली होती. या 12 चित्त्यांमध्ये 7 नर आणि 5 मादींचा समावेश होता. त्यांनाही कूनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते.
भारतीय वन्यजीव संस्था आणि मध्यप्रदेश वन विभागांच्या देखरेखीत हे चित्ते भारतातील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते. साशाच्या मृत्यूमागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न आता अधिकारी करत आहेत.