युद्धात जखमी झाला रशियाचा सैन्यप्रमुख : युक्रेनकडून निकराने प्रत्युत्तर
रशिया-युक्रेन युद्धाला 68 दिवस झाले असून युद्धाच्या आघाडीवर युक्रेनसोबत रशियाच्या सैन्यालाही मोठे झटके बसले आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे विश्वासू सैन्यप्रमुख जनरल वालेरी गेरासिमोव्ह जखमी झाले आहेत. तर खारकीव्ह भागात रशियन मेजर जनरल आंद्रेई सिमोनोव्ह यांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनच्या अध्यक्षांचे सल्लागार एरेस्टोविच यांनी दिली आहे.
युक्रेन युद्धात रशियाच्या सैन्याला आतापर्यंत मोठे नुकसान झेलावे लागले आहे. रशियाचे हजारो सैनिक तसेच शेकडो अधिकारी मारले गेले आहेत. युद्धात पुतीन यांचे टॉप कमांडर जखमी झाले असून त्यांना युद्धभूमीवरून हलविण्यात आल्याचा दावा आता करण्यात येत आहे. रशियन जनरल स्टाफचे प्रमुख वालेरी गेरासिमोव्ह यांना ब्लादिमीर पुतीन यांनी विशेषकरून डोनबास आणि पूर्व क्षेत्रात युद्धाची धुरा स्वतःच्या हातात घेण्यासाठी युपेनमध्ये पाठविले होते.
66 वर्षीय गेरासिमोव्ह युक्रेनच्या खारकीव्ह क्षेत्राच्या ईज्युम शहरात जखमी झाले असून या शहरात सध्या भीषण संघर्ष सुरू आहे. याच भागात रशियाचे नववे मेजर जनरल आंद्रेई सिमोनोव्ह मारले गेले आहेत. स्फोटामुळे गेरासिमोव्ह यांच्या पायाच्या वरील भागाला मोठी ईजा झाल्याचे समजते.
जखमेतून धातूनचे तुकडे बाहेर काढण्यात आल्याने गेरासिमोव्ह यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वृत्त आहे. ईज्युमवरील हल्लया हा गेरासिमोव्ह असलेल्या ठिकाणीच झाल्याचा दावा युक्रेनचे अधिकारी एंटोन गेराशचेंको यांनी केला आहे. गेरासिमोव्ह स्वतःच्या डोनेट्स्कमधील स्लावियांस्क शहरावरील हल्ल्याचे नेतृत्व करण्यासाठी आले होते. मोठय़ा संख्येत रशियाचे वरिष्ठ अधिकारी मारले गेल्याचा दावा गेराशचेंको यांनी केला आहे.
बेलगॉरॉड येथे धाव
ईज्युमजीनक गेरासिमोव्ह हे जखमी झाले होते. त्यांच्या पायाला मोठी ईजा झाली असून त्यांच्या पथकातील तीन सैनिक मारले गेले आणि सैन्यप्रमुखांना तेथून बाहेर काढण्यात आल्याची माहिती टेलिग्राम चॅनेल व्हर्टिकलने दिली आहे. गेरासिमोव्ह यांना तत्काळ एमआय-8 सैन्य हेलिकॉप्टरद्वारे युद्धक्षेत्रावरून पश्चिम रशियाच्या बेलगॉरॉड येथे पोहोचविण्यात आल्याचे समजते.