ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे आज वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बकिंगहॅम पॅलेसने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
राणी एलिझाबेथ यांना वयोमानानुसार आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. फेब्रुवारीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत सुधारली होती. पण चालणे आणि उभे राहण्यात त्यांना अडचणी येत होत्या. दरम्यान, आज त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्यांना स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसलमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मागील 70 वर्षांपासून राणी एलिझाबेथ द्वितीय ब्रिटनच्या सिंहासनावर विराजमान होत्या. प्रकृतीच्या तक्रारींमुळे काही काळापासून त्या बकिंगहॅम पॅलेस सोडून स्कॉटिश राजवाड्यात वास्तव्यास होत्या. नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस यांनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. दुसरीकडे राणी एका बैठकीत त्यांच्या राजकीय सल्लागारांना भेटणार होत्या. परंतु डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने बैठक रद्द करण्यात आली होती. बकिंगहॅम पॅलेसमधील गार्ड चेंजिंग सिरेमनीही रद्द करण्यात आली होती.