Tarun Bharat

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा विजयी

बारदोवाली टाउन मतदारसंघात यश ः आत्माकुरमध्ये वाएसआर काँग्रेसची सरशी

वृत्तसंस्था/ अगरतळा/अमरावती

देशातील 3 लोकसभा आणि 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. दिल्ली, झारखंड, आंध्रप्रदेश आणि त्रिपुरातील 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये 23 जून रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार माणिक साहा यांनी बारडोवाली मतदारसंघात विजय मिळवत स्वतःचे पद राखले आहे. त्यांनी 6,104 मतांनी विजय प्राप्त केला आहे. तर राज्यातील जबराजनगर, सूरमा मतदारसंघात भाजपने यश मिळविले तर अगरतळामध्ये काँग्रेस उमेदवार सुदीप रॉय बर्मन हे आघाडीवर होते. दिल्लीतील राजेंद्रनगर मतदारसंघात आम आदमी पक्ष तर झारखंडमधील मांडरमध्ये काँग्रेस पक्ष सरस ठरला आहे.

आंध्रप्रदेशातील आत्माकुर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत वायएसआर काँग्रेसचे उमेदवार मेकापति विक्रम रेड्डी यांनी 82,888 मतांसह विजय मिळविला आहे. या मतदारसंघात भाजप उमेदवार भरत कुमार गुंदलपल्ली दुसऱया स्थानावर राहिले. पोटनिवडणुकीत विजय मिळवून राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी स्वतःच्या पक्षाचे वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.

काँग्रेसला एका ठिकाणी यश

त्रिपुरातील अगरतळा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार सुदीप रॉय बर्मन हे विजयी झाले आहेत. सुदीप रॉय बर्मन हे यापूर्वी विप्लव देव यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. अलिकडेच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर जुबराजनगर मतदारसंघात भाजपच्या मलीना देवनाथ यांनी आघाडी मिळविली आहे.

विधानसभेची सेमीफायनल

त्रिपुरातील पोटनिवडणुकीला 60 सदस्यीय विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय जाणकार सेमीफायनल ठरवत आहेत. या पोटनिवडणुकीचा निकाल 8 महिन्यांनी होणाऱया विधानसभा निवडणुकीची दिशा निश्चित करणारा असल्याचे त्यांचे मानण आहे. या पोटनिवडणुकीत बोरदोवली या मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या मतदारसंघात 69 वर्षीय माणिक साहा यांनी भाजपच्या उमेदवारीवर विजय मिळविला आहे. माणिक साहा हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आहेत. साह यांनी विप्लव देव यांनी राजीनामा दिल्यावर 15 मे रोजी मुख्यमंत्रिपद स्वीकारले होते. घटनात्मक अनिवार्यतेमुळे त्यांना 6 महिन्यांच्या आत विधानसभा सदस्य होणे गरजेचे हेते.

आंध्रप्रदेशात जगनमोहन यांचा प्रभाव

फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन उद्योगमंत्री आणि आमदार मेकापति गौतम रेड्डी यांच्या निधनामुळे आंध्रप्रदेशच्या आत्माकुर मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आहे. गौतम रेड्डी यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघात यश मिळविले होते. आता त्यांचे कनिष्ठ बंधू आणि वायएसआर काँग्रेसचे उमेदवार मेकापति विक्रम रेड्डी यांनी विजय मिळविला आहे.

राजेंद्रनगरमध्ये ‘आप’ विजयी

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने पोटनिवडणुकीत यश मिळविले आहे. राजेंद्रनगर विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाचे उमेदवार दुर्गेश पाठक यांननी 11 हजार 555 मतांनी विजय मिळविला आहे. राज्यसभेवर निवडून गेलेले राजेंद्रनगरचे आमदार राघव चड्ढा यांनी राजीनामा दिला होता. भाजपचा उमेदवार या पोटनिवडणुकीत दुसऱया स्थानावर राहिला आहे.

त्रिकोणी लढतीचा काँग्रेसला लाभ झारखंडमधील मांडर या विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार शिल्पी नेहा तिर्की यांनी भाजप उमेदवार गंगोत्री कुजूर यांना पराभूत पेले आहे. त्रिकोणी लढतीमुळे काँग्रेसच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. भाजपच्या पराभवामागे देवकुमार धान यांची बंडखोरी कारणीभूत ठरली आहे. धान यांनी एआयएमआयएमचे समर्थन मिळवत निवडणूक लढविली होती. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याप्रकरणी बंधू तिर्की यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांचे विधानसभा सदस्यत्व संपुष्टात आले हेते. काँग्रेसने बंधू तिर्की यांच्या कन्या शिल्पी नेहा तिर्की यांना उमेदवारी दिली होती.

Related Stories

पंजाबमध्ये काँग्रेसकडे शेवटची संधी

Patil_p

डेल्टा प्लस रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग का नाही ? : राहुल गांधी

Tousif Mujawar

रेल्वेच्या डब्यात झाले मतदान

Patil_p

पीएमओ अन् महत्त्वाच्या मंत्रालयांमध्येच हेरगिरी

Omkar B

गोवा मद्य वाहतुक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तस्कराला अटक; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Khandekar

सेन्सेक्स-निफ्टी एक टक्क्यांनी घसरणीत

Patil_p