प्रतिनिधी / बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र यासह इतर अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यती गाजविणारा वडगाव येथील मारुती परशराम पाखरे यांच्या नाग्या बैलाचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे शर्यतप्रेमींतून हळहळ व्यक्त होत आहे.
कारभार गल्ली, वडगाव येथील पाखरे कुटुंबीय बैलगाडा शर्यतीचे शौकीन असून मागील अनेक वर्षांपासून त्यांचा शर्यतींमध्ये दबदबा आहे. नाग्याने देखील मागील 19 वर्षात अनेक शर्यतीचे फज्जे गाजवून 500 हून अधिक बक्षिसांचा मानकरी ठरला आहे. बेळगाव, खानापूर, गोकाक, धारवाड, हुबळी, हल्याळ यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्याने नाव कमावले आहे. पाखरे कुटुंबीयांच्या गोठ्यात गायी, म्हशी आणि शर्यतीचे बैल आहेत. त्यातील ‘हिंदकेसरी’ नाग्या बैलाचा मृत्यू झाला आहे. पोटच्या मुलासारखे नाग्याला सांभाळले होते. मात्र, तो आता आपल्यातून निघून गेल्याने घरातीलच एक सदस्य गेल्याचे दुःख कुटुंबीयांनी व्यक्त केले.
दोन वर्षांचा असताना नाiयाला अंकले बाजारातून 1 लाख 62 हजाराला विकत घेतले होते. त्यानंतर त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम आणि आहारावर भर देण्यात आला होता. 19 वर्षांच्या कालावधीत नाग्याने शर्यतीचे अनेक फज्जे फत्ते केले होते. त्यामुळे नाग्या फज्यात उतरताच शर्यतप्रेमींची गर्दी व्हायची. रविवारी मृत्यूची वार्ता समजताच पाखरे कुटुंबीयांच्या घरी गर्दी झाली होती. त्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरमधून नाग्याची मिरवणूक काढून वडगाव स्मशानभूमीत दफन करण्यात आले. अनेक शर्यतीत नावाजलेल्या नाiयाची मृत्युमुळे वडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी असंख्य शर्यतप्रेमी उपस्थित होते.