सावंतवाडी / प्रतिनिधी-
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे आणि सिंधुदुर्गचे अनोखे नाते निर्माण झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाला शिवसंग्रामच्या माध्यमातून संघटित करण्याचे काम मेटे यांनी गेली वीस वर्षे केले होते. मेटे यांचा वर्षातून दोन वेळा संघटना बांधणीसाठी सिंधुदुर्गात दौरा असे. मराठा समाजाला संघटित करण्यासाठी सनी ही संघटना त्यांनी स्थापन केली. या संघटनेसाठी त्यांनी वाहून घेतले होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. तळागळातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून हा समाज समृद्ध कसा होईल यासाठी त्यांचा प्रयत्न होता. सुरेश गवस, उदय भोसले, सोमा घाडीगावकर,गोपाळ गवस,रामानंद शिरोडकर यासारखे त्यांचे खंदे कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसंग्राम संघटनेचे काम पाहत होते. मेटे आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेला यंदा आले होते. सावंतवाडी त्यांची पत्रकार परिषदही झाली होती यांचा अपघाती निधनाने मराठा समाजाची मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया उदय भोसले यांनी व्यक्त केली आहे.