अमेरिकेत प्रमिला जयपालांसोबत घडला प्रकार : आरोपी अटकेत
वृत्तसंस्था /सिएटल
अमेरिकेतील खासदार प्रमिला जयपाल यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सिएटलमधील एका इसमाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अतिरिक्त पुरावे जमा करण्यात आल्यावर ब्रेट फोरसेलवर बुधवारी आरोप ठेवण्यात आल्याची माहिती किंग काउंटी ऍटर्नी कार्यालयाने सांगितले आहे. फोरसेलला 9 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.
2016 मध्ये जयपाल या अमेरिकेच्या संसदेत निवडून आलेल्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या होत्या. फोरसेलकडे एक घातक शस्त्र होते. तसेच त्याने जयपाल यांचा पाठलाग केला होता असे सांगण्यात आले. फोरसेलने जयपाल यांच्या घराबाहेर त्यांचा नामोल्लेख करत अस्वीकारार्ह टिप्पणी केली होती. याप्रकरणी जयपाल यांनी 911 वर कॉल करत तक्रार केली होती. यावर कारवाई करत सिएटल पोलिसांनी फोरसेल याला अटक केली होती. फोरसेलकडे पोलिसांना पॅलेट गन आढळून आली होती.