लालूपुत्र तेजप्रताप यांनी बैठक सोडली अर्धवट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीत राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गदारोळ झाला. लालू यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्याम रजक यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप करत बैठक सोडली. या गोंधळानंतर श्याम रजक यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसीय परिषदेच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत लालू यादव यांचे पुत्र आणि बिहार सरकारचे मंत्री तेजप्रताप यादव यांच्याशी त्यांचा वाद झाला. बैठकीदरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मंत्री श्याम रजक यांची प्रकृती अचानक बिघडली. राजदच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान बिहार भवनमध्ये ते बेशुद्ध पडले. त्यानंतर सहकाऱयांनी त्यांनी दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरजेडीचे सरचिटणीस श्याम रजक हे दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी झाले होते.
श्याम रजक यांनी आपल्या बहिणीशी वाद घातल्याचे सांगत तेजप्रताप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून निघून गेले. वाद ऐकण्यासाठी बैठकीमध्ये बसू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना तेजप्रताप यांनी श्याम रजक यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यांचा ऑडिओ व्हायरल करण्याचा इशाराही दिला. तेजप्रताप यांनी श्याम रजक यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली होती. या प्रकरणामुळे श्याम रजक तणावात आल्यानंतर बेशुद्ध पडल्याचे समजते.