लम्पी रोगाचा परिणाम : उष्म्यालाही प्रारंभ, दूध उत्पादक चिंतेत, दुभत्या गाई दगावल्याने अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न
बेळगाव : लम्पीचा प्रादुर्भाव, बंद असलेला जनावरांचा बाजार आणि वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शासन, पशुसंगोपन आणि दूध संघांसमोर चिंता वाढली आहे. विशेषत: लम्पी रोगामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेत दुधाच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत असला तरी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. जिल्ह्यात सप्टेंबर दरम्यान लम्पीचा शिरकाव झाला होता. त्यानंतर फैलाव झपाट्याने वाढला आणि जिल्ह्यातील 15 हजाराहून जनावरे या रोगाची शिकार झाली. विशेषत: यामध्ये गोवर्गीय जनावरांचा मृत्यू अधिक झाला. दरम्यान दुभत्या गाई दगावल्याने अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान शासनाने तुटपुंजी मदत करून उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही काही उत्पादक लम्पीच्या धक्क्यातून सावरले नाहीत. शिवाय जनावरांचा बाजारदेखील बंद राहिल्याने नवीन जनावरे खरेदी थांबली आहे. त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, डुक्कर, ससे आदींचा समावेश आहे. यापैकी गाई आणि म्हशींपासून दुधाचे उत्पादन होते. मात्र लम्पी रोगाने जिल्ह्यातील 15 हजार जनावरांचा बळी गेला आहे. यामध्ये दुभत्या जनावरांचा समावेश अधिक आहे. दुभत्या जनावराच्या संख्येत घट झाल्याने याचा दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरम्यान बाजारात दूध विक्रीदरात वाढ झाली आहे. यापैकी बहुतांशी उत्पादकांना शासनाने मदत दिली आहे. मात्र ती तुटपुंजी असल्याने उत्पादक अद्याप अडचणीत असल्याचेही दिसत आहे. गतवर्षी मार्च, एप्रिल दरम्यान जिल्ह्यात 35 हजार लिटर दूध उत्पादन होत होते. मात्र आता या उत्पादनात घट झालेली दिसत आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने ओला चारा कमी झाला आहे. त्यामुळे वाढत्या उष्म्याचा परिणामदेखील दुधावर होऊ लागला आहे. एकूण दूध उत्पादनापैकी काही दुधाचा पुरवठा महाराष्ट्र आणि गोव्यातील दूध संघांना केला जातो तर उर्वरित दूध कर्नाटक मिल्क फेडरेशन (केएमएफ)ला दिले जाते. जिल्ह्यात 16 लाख दुभत्या जनावरांची संख्या आहे. यामध्ये गाई आणि म्हशींचा समावेश आहे. एकूण म्हैस दूध अधिक असले तरी 30 टक्के गायीचे दूध आहे. मात्र लम्पीने हजारो गाईंचा बळी घेतला आहे. त्यामुळे गाय दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे दुधाच्या उपपदार्थांच्या किंमतीदेखील वाढण्याची शक्यता आहे.
दूध उत्पादन पूर्ववत होईल
लम्पीने दुभत्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादनात काहीशी घट झाली आहे. मात्र आता लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. शिवाय जनावरांचे आठवडी बाजारदेखील सुरळीत सुरू झाले आहे. त्यामुळे दूध उत्पादन पूर्ववत होईल.
डॉ. राजीव कुलेर, सहसंचालक पशु संगोपन खाते