भारतात 9 टक्के घट चीनमध्ये सर्वाधिक 14 टक्के घट
नवी दिल्लीः
मागच्या वर्षी जगभरामध्ये स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये घसरण पाहायला मिळाली. यामध्ये सर्वात मोठे दोन देश चीन आणि भारत या देशांमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये परिणाम दिसून आला. मात्र भारतामध्ये चीनच्या तुलनेमध्ये स्मार्टफोनची विक्री कमी घटलेली पाहायला मिळाली. सदरची माहिती कॉऊंटर पाँईंट या संशोधन फर्मने नुकतीच दिली आहे.
भारतामध्ये 2022 मध्ये 2021 च्या तुलनेमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये 9 टक्के घट झाली आहे. 15.2 कोटी स्मार्टफोन्स भारतामध्ये मागच्या वर्षामध्ये विक्री झाले आहेत.
याच दरम्यान प्रिमीयम गटातील स्मार्टफोनची विक्री बऱयापैकी वाढलेली दिसते आहे. स्मार्टफोनच्या एकूण विक्रीमध्ये सदरच्या फोनचा वाटा पहिल्यांदाच दोन अंकी म्हणजेच 11 टक्के इतका झाला आहे. 30 हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या स्मार्टफोनच्या विक्रीतील वाटा वाढून 35 टक्के झाला आहे. हा विक्रीतील एक प्रकारचा विक्रमच मानला
जातो.
चीनमध्ये पाचव्या वर्षी विक्रीत घट
सर्वात मोठी बाजार पेठ समजल्या जाणाऱया चीनमध्ये सलग पाचव्या वर्षी स्मार्टफोनची विक्री घसरलेली दिसली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाहता 14 टक्के इतकी विक्रीमध्ये घसरण दिसली आहे. विक्रीचा दशकातील इतिहास पाहता सर्वाधिक घसरण मागच्या वर्षी दिसली आहे.
5जी फोन्सचा वाटा 32 टक्के
स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये 5जी फोन्सचा वाटा 2022 मध्ये वाढून 32 टक्के इतका झाला आहे. 2021 मध्ये हाच वाटा 19 टक्के इतका नोंदला गेला होता. 21 टक्के वाटय़ासह सॅमसंग ही कंपनी स्मार्टफोनमध्ये आघाडीवर राहिली आहे. स्मार्टफोन विक्रीतील कमाईमध्येदेखील याच कंपनीने 22 टक्के इतका वाटा उचलला आहे.