महालक्ष्मीचा जयघोष : भंडाऱ्याची उधळण : महाप्रसाद, ओटी भरणे कार्यक्रम उत्साहात
वार्ताहर /किणये
ढोलताशा व पारंपरिक वाद्यांचा गजर, भंडाऱ्याची उधळण करत व लक्ष्मी माता की जय.. असा जयघोष करीत शेकडो भाविकांच्या उपस्थितीत बिजगर्णी येथील महालक्ष्मीदेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी मोठ्या थाटात पार पडला.
बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप या तिन्ही गावची ही ग्रामदेवता असून तिन्ही गावच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्याच्या पश्चिम भागातील भाविकांनी मंगळवारी दिवसभर देवीचे दर्शन घेतले.प्रत्येकाच्या घरासमोर आकर्षक अशा रांगोळी काढण्यात आल्या होत्या. यामुळे अवघा परिसर चैतन्यमय बनला होता.
तीन दिवस मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा झाला. रविवारी भंडाऱ्याची उधळण करीत गावात देवीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सोमवारी सकाळी मंदिरात काकड आरती, त्यानंतर होमहवन व पूजाविधी करण्यात आल्या. दिवसभर विविध गावांमधील भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम झाले. सायंकाळी हरिपाठ कार्यक्रम झाला. जट्टेवाडी येथील डॉ. विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन झाले. त्यानंतर मंदिरासमोर दीपोत्सव कार्यक्रम झाला. रात्री कीर्तन व त्यानंतर जागर भजनाचा कार्यक्रम झाला.
मंगळवारी या लोकार्पण सोहळ्याचा मुख्य दिवस होता. मंगळवारी पहाटे काकड आरती झाली. मुक्तीमठ भुतरामटी येथील तपोरत्न शिवसिद्ध सोमेश्वर स्वामींचे ब्रह्मलिंग मंदिर येथे आगमन होताच स्वागत करण्यात आले. त्यानंतर ब्रह्मलिंग मंदिरापासून ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
शिवसिद्ध सोमेश्वर स्वामींच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विश्वनाथ पाटील तसेच पुरोहित राजेश कुलकर्णी व सुभाष कुलकर्णी यांच्या वतीने विधिवत श्री महालक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम झाला.
दुपारी मंदिराचा उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व मृणाल हेबाळकर यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शविली होती. यानंतर देवीला ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला.
भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते. देवीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती.