कंग्राळी खुर्दच्या शिरपेचात मानाचा तुरा : भजनी मंडळाचे कार्य कौतुकास्पद झाल्याने शंकर मुतगेकरांचा सत्कार
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द येथील दीपा तबला वादन विद्यालय व सांस्कृतिक कला मंच या भजनी मंडळाने बारामती (महाराष्ट्र) येथे झालेल्या अखिल भारतीय सृजन भजन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत रोख 31 हजार रुपये व चषक मिळविला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र अंध तबला वादक गुरुवर्य शंकर मुतगेकर यांनी स्थापन केलेल्या दीपा तबला वादन कला मंचच्या माध्यमातून अखिल भारत सृजन भजन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवून कंग्राळी खुर्द गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्याचे कार्य केल्यामुळे अंध शिक्षक हभप गुरुवर्य शंकर मुतगेकर यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
‘पंढरीशी जावे आल्याने संसारा’ अभंग सादर
गेला महिनाभर सुरू असलेली ही स्पर्धा महाराष्ट्रातील आठ व दक्षिण भारतातील एक अशा नऊ गटात पार पडली. यामध्ये पहिल्या दोन फेऱया ऑनलाईन पद्धतीने झाल्या. दक्षिण भारत गटात कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू व केरळ या राज्यांतून 161 भजनी मंडळांनी भाग घेतला होता. स्पर्धेमध्ये दीपा तबला वादन विद्यालय व कला मंच या भजनी मंडळाने ऑनलाईनद्वारे उत्कृष्ट सादरीकरण केल्याने त्यांची ऑफलाईन अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. त्यानुसार 28 ऑगस्टला बारामती येथे झालेल्या स्पर्धेत ‘पंढरीशी जावे आल्याने संसारा’ हा सात मिनिटांचा अभंग सादर करण्यात आला. या अभंगातील उत्कृष्ट सादरीकरणाची पोचपावती म्हणूनच या भजनी मंडळाची तृतीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली.
तृतीय क्रमांकाचे रोख 31 हजार रुपये व चषक आमदार रोहित पवार व अशोक सावंत महाराज यांच्या हस्ते मंडळाकडे देण्यात आले.
भजनी मंडळात विनायक मुतगेकर, सोनाली चिखलकर, रिया बेन्नाळकर, वैष्णवी पुजारी, गायत्री मंडोळकर, लक्ष्मण गुरव व श्रीनिवास रघुनाथी यांचा सहभाग होता.
ग्रामस्थांच्यावतीने जल्लोषात स्वागत
दीपा तबला वादन भजनी मंडळ सदस्यांनी गावात प्रवेश करताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी शिवप्रति÷ान हिंदुस्थान, कंग्राळी खुर्द शाखा धारकरी व ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.