वृत्तसंस्था/ मुंबई
पाठीच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपरकिंग्सचा जलद गोलंदाज अष्टपैलू दीपक चहरला उर्वरित आयपीएलमधून बाहेर पडावे लागल्याने चेन्नईच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
दीपक चहर चेन्नईचा स्ट्राईक बॉलर असून 14 कोटीला त्यांनी चहरला लिलावात खरेदी केले आहे. मात्र त्याच्याशिवाय या स्पर्धेत चेन्नईला उतरावे लागल्यानंतर त्यांना मंगळवारचा सामना होईपर्यंत चारही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. दहा संघांच्या या स्पर्धेत गुणतक्त्यात चेन्नई संघ तळाच्या स्थानावर आहे. एप्रिलच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत चहर पूर्ण फिट होईल, असा दावा वारंवार चेन्नई संघ करीत होता. पण त्याच्या दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने तो आता उपलब्ध होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याचे रिहॅब सुरू असताना त्याच्या पाठीला ही दुखापत झाली होती, असे सूत्रांनी सांगितले. बेंगळूरमधील अकादमीत तो जवळपास महिनाभरापासून आहे. फेबुवारीत विंडीजविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेवेळी झालेल्या दुखापतीनंतर त्याचे तेथे रिहॅब सुरू होते. यामुळे त्याला लंकेविरुद्धच्या मालिकेलाही मुकावे लागले होते.