मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी युतीबाबत चर्चा केली होती का? शेवाळेंनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत का? याचं उत्तर उध्दव ठाकरे यांनी द्यावं असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी विचारला. आज कोल्हापुरात शिवसैनिकांनी शिंदे गटात सामिल झालेले खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.एखाद्या खासदाराच्या घरावर मोर्चा काढून हिनवण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्याला शांतता हवी आहे. आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही. तुम्हाला जर जनतेशी बोलायचं आहे तर तुम्ही सभा घ्या. एखाद्या खासदाराच्या घरावर मोर्चा काढून हिनवण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मोर्चे काढण्याचे तुम्हाला कोणी अधिकार दिले. खोट सांगून जनतेला रडवण्याचे काम सध्या सुरु आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
संजय राऊतांवर निशाणा साधताना ते म्हणाले, केंद्र आणि राज्याचे संबंध चांगले राहिले पाहिजेत. रोज सकाळी ९ वाजता कुणी तरी बोलायचं. राऊतांच्या विधानामुळे केंद्रासोबतचे संबंध खराब झाले. तुम्ही राजकारण करा, मुलाखती द्या पण जनतेच्या हिताचे बोला. टीका करणे, काहीही बोलणे हे आता कुठेतरी थांबले पाहिजे असंही ते म्हणाले.
बंडखोरीनंतर कटकारस्थान केला असा आरोप सतत केला जातो. यासंदर्भात बोलताना केसरकर म्हणाले, मुळात कटकारस्थान झालचं नव्हत. आम्ही तुम्हाला आघाडी नको हे आधीच सांगत होतो. तुम्हाला जर मुंबईची मराठी अस्मिता जपायची होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी का चर्चा केली नाही. आज तुम्ही मुंबईत दिसत आहोत. युवासेनेचे प्रमुख कालपर्यत कोठेच दिसत नव्हते आता शाखेत फिरू लागले आहेत. दौरे करत आहात. किती वेळा तुम्ही तुमच्या कार्यालयात गेला याचे उत्तर द्या असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला. कोर्टात, निवडणूक कमिशनमध्ये निर्णय होईल.लोकांच्या घरावर मोर्चे घेऊन जाणे थांबवा. यामुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण होईल, असेही ते म्हणाले.


previous post