Deepak Kesarkar Visit In Kolhapur : शिवाजी महाराज, शाहू महाराज, ताराराणीच्या पराक्रमाच प्रतिक कोल्हापूर आहे. शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सरकार काम करतयं. सातारा, कोल्हापूर गादीच महत्व जपलं पाहिजे.अंबाबाईची सेवा माझ्याकडून व्हावी अशी देवीची इच्छा असेल म्हणूनच कोल्हापुरात असतानाच पालकमंत्री झाल्याचं समजलं. आता बुधवारपासून कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली. ते आज पत्रकारांशी कोल्हापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, कोल्हापूरच्या हेरिटेज इमारती, तालमी यांकडे विशेष लक्ष असणार आहे. तालमींना कशी मदत करता येईल याचा प्लॅन तयार करायला सांगितला आहे. मराठी बाणा मुंबईमध्ये टिकवायचा आहे. भाजप आणि सेनेला जोडणारा मी दुवा आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती कायम राहवी यासाठी माझा प्रयत्न असणार आहे.अंबानी हे देशातील आघाडीचे उद्योगपती आहेत त्यांनी मनात आणलं तर ते महाराष्ट्रात अनेक उद्योग आणू शकतात असा विश्वासही व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत मोठा गौप्यस्फोट
वेदांन्ता प्रकल्पा (Vedanta Foxconn Project) संदर्भात बोलताना ते म्हणाले, जे लोक आमच्यामुळे प्रकल्प बाहेर गेला असा आरोप करत आहेत त्यांच्यासाठी रेकॉर्ड जाहीर करायला आम्ही तयार आहोत. ज्यांनी दोन वर्षे या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केलं ते जबाबदारी स्वीकारत नाहीत. कोणताही प्रकल्प राज्यात येताना हाय पावर कमिटी असते. अरब देशातील राजपुत्र, मोठ्या बँकांचे प्रतिनिधी आले होते मी त्या काळच्या मुख्यमंत्र्यांना या सर्वांना अर्धा तास भेट देण्याची विनंती केली होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्र्यांची भेट घ्यायला सांगितल ह्या गोष्टीचा मी साक्षीदार असल्याचे सांगत मोठा गौप्यस्फोट केला.
आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, ज्यांनी सभा घेतली त्यांच्या वडिलांनी मुख्यमंत्री असताना हाय पॉवर कमिटी मीटिंग घ्यायला का भाग पाडले नाही. म्हणजे ज्यांनी सूरा खुपसला त्यांच्या सभांना गर्दी होत असेल तर वस्तुस्थिती समोर यायला हवी. आदित्य ठाकरे मंत्रालयात आपल्या कार्यालयात किती वेळा गेले हे जाहीर करावे.जे कार्यालयात जाऊ शकले नाहीत ते इन्वेस्टमेंट काय आणणार. प्रकल्प कसे आणायचे आम्हाला चांगलं माहिती आहे. आदित्य ठाकरे खोटं बोलून महाराष्ट्रभर फिरत असतील तर ही ‘ग्लोबल नीती’ आहे. शंभर वेळा खोटं बोलण्याचं पाप आज महाराष्ट्रात घडतयं. महाराष्ट्राची जनता दाखवून देईल खरं कोण, खोटं कोण. ६५ कोटी ची सबमरीन मी जाहीर केली होती. त्याबद्दल आदित्य ठाकरें काहीही करू शकले नाहीत. तुम्हाला पर्यटन आणि उद्योगावर बोलायचं काय अधिकार आहे. तुम्ही खोटं सांगत असाल तर आम्हालाही खरं सांगत महाराष्ट्रातील जनतेला सांगावे लागेल असा घणाघात त्यांनी केला.
दप्तराचं ओझं कमी झालं
शालेय शिक्षणमंत्री झाल्यानंतर कोणते बदल केले याविषयी सांगताना ते म्हणाले, शिक्षणासंबंधी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. दप्तराचं ओझं कमी केलयं. पुढच्या वर्षीपासून सर्वांना मोफत वह्या देणार असल्याची माहितीही सांगितली.


previous post