रोहित शेट्टी लवकरच स्वतःचा आगामी चित्रपट ‘सिंघम 3’चे काम सुरू करणार आहे. दीपिका यात महिला पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारणार असल्याचा खुलासा त्याने केला आहे. सिंघम 3 चित्रपटाच्या कामास लवकरच प्रारंभ केला जाणार असल्याचे रोहित शेट्टीने सांगितले आहे. दीपिकाच्या पोलीस युनिव्हर्समधील एंट्रीमुळे सिंघम चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
माझ्या पोलीस युनिव्हर्समध्ये महिला पोलीस अधिकाऱयाची भूमिका कोण साकारणार अशी विचारणा केली जात होती. सिंघम 3 मध्ये दीपिका ही लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसून येणार असल्याचे सांगू इच्छितो. पुढील वर्षी आम्ही याचे चित्रिकरण सुरू करणार आहोत असे रोहितने सांगितले आहे. रोहित शेट्टीच्या कॉर्प युनिव्हर्समध्ये सिंघम, सिंघम रिटर्न्स, सिंबा आणि सूर्यवंशी यासारखे चित्रपट सामील आहेत. सिंघम प्रेंचाइजीमध्ये अजय देवगण मुख्य भूमिका साकारताना दिसून आला आहे. दीपिका देखील याच प्रेंचाइजीचा हिस्सा होणार असून तिचा चित्रपट पुढील वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.