वृत्तसंस्था/ लखनौ
मुंबईत पहिल्यांदाच 4 ते 26 मार्च दरम्यान खेळविल्या जाणाऱया महिलांच्या प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेत सहभागी होणाऱया युपी वॉरियर्स संघाच्या उपकर्णधारपदी भारताची अष्टपैलू दीप्ती शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीसीसीआयतर्फे पहिल्यांदाच महिलांची प्रिमियर लीग टी-20 स्पर्धा आयोजित केली असून ही स्पर्धा मुंबईतील बेबॉर्न आणि नव्या मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी महिला क्रिकेटपटूंचा लिलाव यापूर्वीच करण्यात आला होता. युपी वॉरियर्सच्या फ्रँचायजींनी क्रिकेटपटूंच्या लिलावावेळी 25 वर्षीय दीप्ती शर्माला 2.6 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. युपी वॉरियर्स संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची ऍलिसा हिली करीत आहे. या संघाला इंग्लंडचे जॉन लेविस आणि अंजु जैन हे मार्गदर्शक लाभले आहेत. या स्पर्धेत एकूण 22 सामने खेळविले जाणार आहेत. युपी वॉरियर्सचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 5 मार्चला होणार आहे. युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील हा सलामीचा सामना डी. वाय. स्टेडियमवर खेळविला जाईल. युपी वॉरियर्स संघाची ऑस्ट्रेलियाची लिसा स्थळेकर ही मेंटॉर म्हणून कार्यरत राहणार आहे.
युपी वॉरियर्स संघ- ऍलिसा हिली (कर्णधार), सोफी इक्लेस्टोन, दीप्ती शर्मा, ताहिला मॅकग्रा, शबनीम इस्माईल, अंजली सर्वानी, राजेश्वरी गायकवाड, पार्श्वी चोप्रा, श्वेता शेरावत, एस. यशश्री, किरण नेवगिरे, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, सिमरन शेख.