वृत्तसंस्था/ दुबई
मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय संघातील अष्टपैलू 25 वर्षीय दीप्ती शर्माने दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. या मानांकन यादीत इंग्लंडची सोफी इक्लेस्टोन पहिल्या क्रमांकावर आहे.
दक्षिण आफ्रिकेत सध्या सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 तिरंगी मालिकेत दीप्ती शर्माने सर्वाधिक म्हणजे 9 गडी बाद केले आहेत. आयसीसीच्या टी-20 महिलांच्या गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत आता आघाडीची इक्लेस्टोन आणि दीप्ती शर्मा यांच्या केवळ 26 रेटींग गुणांचा फरक आहे. या ताज्या यादीमध्ये दीप्ती शर्माने 737 मानांकन गुण घेत दुसरे स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिका संघातील डावखुरी फिरकी गोलंदाज मलाबाने या मानांकन यादीत 732 मानांकन गुणासह तिसरे स्थान मिळवले आहे. 10 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेत आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी सराव होण्याच्या हेतूने तिरंगी टी-20 मालिका दक्षिण आफ्रिकेत खेळवली जात आहे. भारताची फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडने या यादीत 14 वे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज स्कूट पाचव्या स्थानावर, इंग्लंची कॅथरिन ब्रंट सहाव्या स्थानी आहे.
आयसीसीच्या टी-20 महिलांच्या फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची फलंदाज ताहिला मॅक्राने आघाडीचे स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वुलर्व्हट नवव्या स्थानावर आहे. विंडीजची कर्णधार हिली मॅथ्यूज 22 व्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाची इलेसी पेरीने दहावे स्थान मिळवले आहे.