वृत्तसंस्था/ सिडनी
येथे सुरु असलेल्या पहिल्या युनायटेड चषक मिश्र संघिक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉपसिडेड राफेल नदालला सलग दुसऱया पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र ग्रीसचा सित्सिपेस आणि स्वायटेक यांनी मात्र आपले विजय नोंदविले. या स्पर्धेत अन्य लढतींमध्ये ब्राझीलने नॉर्वेवर, पोलंडने कझाकस्थानवर, झेकने जर्मनीवर आघाडी मिळविली आहे.
जर्मनीच्या व्हेरेव्हला नदालप्रमाणेच या स्पर्धेत दुसऱया पराभवाला सामोरे जावे लागले. नदालला या स्पर्धेतील गेल्या शनिवारच्या सामन्यात ब्रिटनच्या नुरीकडून हार पत्करावी लागली होती. तर त्यानंतर त्याला दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डी मिनॉरने पराभूत केले आहे. जर्मनीच्या व्हेरेव्हला अमेरिकेच्या टेलर फ्रिझने पराभूत केले. या मिश्र संघिक टेनिस स्पर्धेत ड गटातून स्पेन किंवा ऑस्ट्रेलिया यांना प्रगती करता आली नाही. पण ब्रिटनने या गटात विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला आहे. आता ब्रिटन आणि अमेरिका यांच्यात पुढील फेरीची लढत होईल.
अमेरिका आणि जर्मनी यांच्यातील झालेल्या लढतीत अमेरिकेच्या फ्रिझने जर्मनीच्या व्हेरेव्हचा 6-1, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. शनिवारी व्हेरेव्हला जेकच्या लिहेकाकडून पराभव पत्करावा लागला होता. अमेरिकेच्या मॅडिसन किझने जर्मनीच्या निमेरवर 6-2, 6-3 अशी मात केली. स्विस विरुद्धच्या लढतीत स्वायटेकने आपला एकेरीचा सामना जिंकून पोलंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आहे. स्वायटेकने बेनसिकचा 6-3, 7-6 (7-3) असा पराभव केला. इ गटातून यापूर्वीच बाहेर पडलेल्या नॉर्वे संघाविरुद्ध इटलीला विजयाची गरज आहे. बेल्जियम आणि ग्रीस यांच्यातील लढतीत ग्रीसच्या सित्सिपेसने बेल्जियमच्या गोफिनचा 6-3, 6-2 असा पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आहे.
इ गटातील लढतीत ब्राझीलने नॉर्वेचा 3-1 अशा फरकाने पराभव केला. या लढतीत ब्राझीलने आपले सलामीचे दोन्ही एकेरीचे सामने जिंकून नॉर्वेवर आघाडी मिळविली होती. त्यानंतर सोमवारी ब्राझीलच्या पिगोसीने नॉर्वेच्या इकेरीचा 6-3, 6-4 असा पराभव केला. त्यानंतर नॉर्वेच्या कास्पर रुडने आपला सामना जिंकून ब्राझीलची आघाडी थोडी कमी केली होती.
ब्रिस्बेनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेतील लढतीत पोलंडने कझाकस्थानवर 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. पोलंडच्या हुरकेझने कझाकस्थानच्या बुबलिकवर 7-6 (8-6), 4-6, 6-3 असा विजय मिळविला. दुसऱया एका सामन्यात पोलंडच्या लिनेटीने कझाकस्थानच्या झिबेकचा 6-2, 6-1 असा पराभव केला.
सिडनीमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेतील रविवारच्या लढतीत क्विटोव्हाच्या विजयामुळे क गटातील या लढतीत झेकने जर्मनीवर 3-0 अशी एकतर्फी आघाडी मिळविली आहे. झेकच्या क्विटोव्हाने जर्मनीच्या सिगमंडचा 6-4, 6-2 असा पराभव केला. या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात क्विटोव्हाने जर्मनीच्या पेगुलाचे आव्हान 7-6 (8-6), 6-4 असे संपुष्टात आणले होते.