कोव्हिडच्या धक्क्यातून सावरणाऱया दिल्ली कॅपिटल्सचा 9 गडी राखून एकतर्फी विजय
मुंबई / वृत्तसंस्था
पथकात सहा सदस्य कोरोनाग्रस्त आढळून आल्याने गोटात भय व चिंतेची छटा असताना देखील दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल साखळी सामन्यात पंजाब किंग्सचा तब्बल 9 गडी राखून फडशा पाडत यंदाच्या हंगामातील सर्वात एकतर्फी निकालाची नोंद केली. दिल्लीने प्रारंभी भेदक गोलंदाजीच्या बळावर पंजाबचा डाव सर्वबाद 115 धावांमध्ये संपुष्टात आणला आणि नंतर पृथ्वी शॉ (20 चेंडूत 41) व डेव्हिड वॉर्नर (30 चेंडूत नाबाद 60) यांच्या 39 चेंडूतील 83 धावांच्या फ्लाईंग स्टार्टमुळे 9 गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला. दिल्लीने अवघ्या 10.3 षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले.
विजयासाठी 116 धावांचे अतिशय किरकोळ आव्हान समोर असताना वॉर्नर व शॉ जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडले आणि चौफेर फटकेबाजी करत पंजाबच्या गोलंदाजांची उत्तम धुलाई केली. पॉवर प्लेच्या 6 षटकात बिनबाद 81 धावा केल्या, त्याचवेळी दिल्लीचा विजय सुनिश्चित झाला होता. दिल्लीसाठी हा 6 सामन्यातील तिसरा विजय तर पंजाबसाठी 7 सामन्यातील चौथा पराभव ठरला.
प्रारंभी, दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला अवघ्या 115 धावांवर रोखण्यात यश प्राप्त केले. केवळ एक दिवस आधी पुण्याऐवजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय झालेल्या या लढतीला काही तासांचा अवधी बाकी असताना टीम सेफर्ट कोरोनाग्रस्त झाल्याने दिल्लीला आणखी एक धक्का बसला. पण, यानंतरही त्यांनी जिगरबाज खेळ साकारत विजय संपादन केला.
ललित यादव (2-11), कुलदीप यादव (2-24) व अक्षर पटेल (2-10) या दिल्लीच्या फिरकी त्रिकुटाने दिल्लीला सातत्याने धक्के दिले. सलामीवीर मयांक अगरवाल (24) व शिखर धवन (9) स्वस्तात बाद झाल्यानंतर पंजाबची प्रारंभीच 2 बाद 35 अशी पडझड झाली. मागील लढतीत तळपायाच्या दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या मयांकने येथे कटचा चौकार वसूल करत जोरदार सुरुवात केली. शिवाय, शार्दुलला तिसऱया षटकात 3 चौकारासाठी पिटाळत 14 धावा वसूल केल्या. पण, नंतर मुस्तफिजूरने त्याचा त्रिफळा उडवला. ऑफस्पिनर ललितने धवनला यष्टीमागे पंतकरवी झेलबाद केले.
अक्षर पटेलने आपल्या पहिल्याच षटकात बहरातील लिव्हिंगस्टोनला (2) पंतकरवी यष्टीचीत केले, तेथे पंजाबची मोठी पिछेहाट झाली. लिव्हिंगस्टोनचा पुढे सरसावून उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न सपशेल फसला. पुढे जॉनी बेअरस्टोने (9) खलील अहमदच्या गोलंदाजीवर फाईन लेगवर तैनात मुस्तफिजूरकडे सोपा झेल दिला. 5 चौकारांसह 32 धावा जमवणाऱया जितेन शर्माने शाहरुखसह (12) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, अक्षरने जितेनला पायचीत केले. यावेळी पंजाबचा निम्मा संघ 85 धावात तंबूत परतल्याचे अधोरेखित झाले.
चायनामन कुलदीपने 14 व्या षटकात रबाडा (2), इलिस (0) यांना स्वस्तात बाद केले. गडी गमावण्याचा सिलसिला सुरुच राहिल्याने पंजाबची एकवेळ 5 बाद 85 वरुन 8 बाद 92 अशी आणखी पडझड झाली. खलीलने शाहरुखला बाद करत आपला दुसरा बळी नोंदवला तर राहुल चहर (12) ललितचे दुसरे सावज ठरला. पेसर्स खलील व मुस्तफिजूर यांनी एकत्रित 3 बळी घेत फिरकीपटूंना उत्तम साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्स ः 20 षटकात सर्वबाद 115 (जितेन शर्मा 23 चेंडूत 5 चौकारांसह 32, मयांक अगरवाल 15 चेंडूत 4 चौकारांसह 24, एम. शाहरुख खान 12, राहुल चहर 12. अवांतर 2. अक्षर 2-10, ललित 2-11, खलील अहमद 2-21, कुलदीप यादव 2-24).
दिल्ली कॅपिटल्स ः 10.3 षटकात 1 बाद 119 (डेव्हिड वॉर्नर 30 चेंडूत 10 चौकार, 1 षटकारासह नाबाद 60, पृथ्वी शॉ 20 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 41, सर्फराज खान 13 चेंडूत नाबाद 12. अवांतर 6. राहुल चहर 2.3 षटकात 1-21).