ऑनलाईन टीम/तरुण भारत
दिल्लीच्या दंगलग्रस्त जहांगीरपुरीतल्या अनधिकृत बांधकामांवरती आजपासून पोलिसांनी कठोर करवाईला सुरूवात केली आहे. येथील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला जात आहे. या कारवाईवेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जवळपास दीड हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेत हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम सुरु आहे. मात्र, हे तोडकाम थांबवण्याचे आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महापालिकेला दिले आहेत. तसेच या प्रकरणी आता सुनावणी देखील उद्या होणार आहे.
दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. समाजकंटकांनी या यात्रेवर दगडफेक केली होती, तसंच अनेक वाहने पेटवून देण्यात आली होती. या हिंसाचारत आठ पोलीस कर्मचाऱ्यांसह नऊ जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलीस याप्रकरणी तपास करत असून आतापर्यंत २५ जणांना अटक केली असून दोन अल्पवयीन ताब्यात आहेत. दरम्यान पालिकेने दंगलग्रस्त भागातील अनधिकृत बांधकांमावर कारवाई सुरु केली आहे. मात्र जहांगीरपुरीमधील या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने ब्रेक लावला आहे.
दरम्यान, जहांगीरपुरी भागात अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरूवात करण्याआधी या भागात पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला. तसेच कारवाई करण्यापूर्वी येथील स्थानिक लोकांनी साहित्य दुसरीकडे नेण्यास सुरूवात केली आहे. काही साहित्य हे रस्त्यावर असलेलं दिसत आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईत दिल्ली पोलिसांचं मोठं बळ असताना दिसत आहे. या कारवाईत स्थानिक लोकांनी सहकार्य करावं, अशा प्रकारचं आवाहन दिल्ली पोलिसांकडून करण्यात येत आहे.