Tarun Bharat

दिल्ली महापौर निवडणूक पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दिल्ली महानगरपालिकेच्या बैठकीत यावेळीही नव्या महापौरांची निवड होऊ शकली नसल्याने सभागृहाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्या सदस्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाल्याने सभागृहात गोंधळ उडाला. परिणामी, सभागृहाचे अध्यक्ष सत्य शर्मा यांनी सभागृह अनिश्चित काळासाठी संस्थगित केल्याची घोषणा केली.

शर्मा यांनी सदस्यांच्या वागणुकीसंबंधी तीव्र नाराजी व्यक्त केली. असा गोंधळ चालणार नाहीं, असा इशारा त्यांनी दिला. तथापि, सदस्यांनी त्यांचे ऐकले नाही. यावेळी सभागृहात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही पक्षांचे सदस्य एकमेकांच्या दिशेला धावून जात असल्याचेही दिसून आले.

आममध्येच मतभेद ?

महापौर कोणाला करावे यावरुन सत्ताधारी आम आदमी पक्षात मतभेद असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महापौर पदासाठी या पक्षाच्या अधिकृत उमेदवार शेली ओबेरॉय या आहेत. मात्र, याच पक्षाच्या आशू ठाकूर याही या पदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे त्वरित महापौर निवडण्याची त्या पक्षाची इच्छा नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. मतभेद मिटल्यानंतरच निवडणूक मार्गी लागण्याची शक्यता आहे. भाजपने या पदासाठी रेखा गुप्ता या एकमेव उमेदवारची निवड केली आहे.

गेल्यावेळीही महापौरांची निवड लांबणीवर पडली होती. सभागृहाचे अध्यक्ष सत्य शर्मा हे भाजपचे असून त्यांनी मागच्या बैठकीत प्रथम 10 अल्डरमनना (सभागृहाचे नियुक्त सदस्य) शपथ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आम आदमी पक्षाने त्याला विरोध केला. या पक्षाला त्याच्या पसंतीच्या अल्डरमनची नियुक्ती हवी होती. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. अल्डरमनना सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो. मात्र, सभागृहाच्या कामकाजामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्वाची असते. कित्येकदा त्यांना निवडून आलेल्या सदस्यांपेक्षाही अधिक महत्व असते. त्यामुळे त्यांच्या निवडीवरुन दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये मतभेद आहेत. हे गोंधळाचे प्रमुख कारण आहे.

भाजपला आत्मविश्वास

सभागृहात शांतता स्थापन झाली आणि योग्य प्रकारे मतदान पार पडले तर भाजपचाच उमेदवार महापौर म्हणून निवडून येईल असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला. आम आदमी पक्षाचे काही सदस्य भाजपच्या उमेदवाराला मतदान करतील अशी चर्चा प्रारंभापासून होत आहे. महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. त्यामुळे कोणत्याही नगरसेवक कोणत्याही उमेदवाराला मत देऊ शकतो. भाजपची भिस्त या नियमावरच असल्याचे दिसून येते, सभागृहात प्रामुख्याने आम आदमी पक्षाचेच सदस्य गोंधळ घालताना दिसून येतात. याचे कारण त्यांच्याच पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे. पण महापौर निवडणूक अशा प्रकारे किती काळ लांबविली जाईल, हाही प्रश्न विचारण्यात येत असून कदाचित पुढच्या वेळी सभागृहाचे कामकाज सुरळीत होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Related Stories

लडाखमध्ये भूकंप, जीवितहानी नाही

Patil_p

सीबीएसई परीक्षांची 31 डिसेंबरला घोषणा

Patil_p

धक्कादायक! कोरोनाची लागण झालेल्या जवानाने झाडाला लटकून केली आत्महत्या

Tousif Mujawar

CRPF जवानाची हत्या करणारा दहशतवादी अटकेत

Archana Banage

रतन टाटांनी पुन्हा जिंकली भारतीयांची मने

Patil_p

थोडय़ाच वेळात निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार

prashant_c