नवी मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी सोमवारी येथे होणाऱया सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन्ही संघांचे लक्ष विजयावर राहील. हा सामना येथील डी.वाय. पाटील स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
या स्पर्धेत दिल्ली आणि पंजाब या दोन्ही संघांनी पाठोपाठ विजय नोंदविले असले तरी त्यांना आता उर्वरित प्राथमिक गटातील सामन्यात पराभव टाळणे जरूरीचे आहे. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पंजाबचा संघ सातव्या तर दिल्लीचा संघ सरस धावसरासरीच्या जोरावर पाचव्या स्थानावर आहे. पंजाबने 12 गुण मिळविले असून त्यांचा रनरेट 0.023 असा आहे. तर दिल्लीने 12 गुण घेतले असून त्यांचा रनरेट 0.210 असा असल्याने या संघाने सरस धाव सरासरीच्या जोरावर पंजाबला मागे टाकले आहे. दिल्ली संघाने आपल्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा आठ गडय़ांनी पराभव केल्याने पंतचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. दिल्ली संघासमोर सलामीच्या जोडीची समस्या अद्याप कायम आहे. वॉर्नरसमवेत मनदीप सिंग किंवा एस.भरत यापैकी एकाला पाठविले जाईल. पृथ्वी शॉच्या गैरहजेरीमुळे दिल्ली संघासमोर ही समस्या अद्याप कायम आहे. पृथ्वी शॉ ला टॉईफाईड झाल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. रविवारी शॉ ला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी होणाऱया सामन्यात मिचेल मार्शचा समावेश असल्याने दिल्लीच्या फलंदाजीची समस्या थोडी कमी होईल. राजस्थानविरूद्धच्या सामन्यात मार्श आणि वॉर्नर यांची कामगिरी महत्त्वाची ठरली होती. पॉवेल या संघातील आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. दिल्लीच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने नॉर्त्जे, अक्षर पटेल, सर्फराज खान, मुस्ताफिजुर रेहमान, पॉवेल यांच्यावर राहील.
पंजाब संघाच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने शेखर धवन, कर्णधार अगरवाल, बेयरस्टो, लिव्हिंगस्टोन, राजपक्षे यांच्यावर राहील. पंजाब संघातील सलामीच्या धवनने या स्पर्धेत 400 धावांचा टप्पा ओलांडला आहे. कर्णधार अगरवाल फलंदाज्चीचा सुर मिळविण्यासाठी झगडत आहे. रेबाडा, अर्षदीप सिंग, शाहरूख खान, ऋषी धवन हे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. सोमवारी होणाऱया या सामन्यात दोन्ही संघांचे लक्ष विजयावर राहील.
संभाव्य संघ खेळाडू
दिल्ली कॅपिटल्स– ऋषभ पंत (कर्णधार), हेबार, वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी शॉ, आर. पॉवेल, नॉर्त्जे, साकारिया, खलील अहमद, कुलदीप यादव, एन्गिडी, मुस्ताफिजुर रेहमान, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपाल पटेल, सर्फराज खान, ओसवाल, यश धुल, के.एस. भरत आणि सिफर्ट.
पंजाब किंग्ज – शिखर धवन, मयांक अगरवाल (कर्णधार), अर्षदीप सिंग, रेबाडा, बेयरस्टो, राहुल चहर, हरप्रित ब्रार, शाहरूख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, पोरल, लिव्हिंगस्टोन, ओडेन स्मिथ, संदीप शर्मा, राज बावा, ऋषी धवन, पी. मंकड, वैभव अरोरा, चेटर्जी, दंडा, अनिष पटेल, इलीस, तायडे, राजपक्षे आणि हॉवेल.