नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीतील गोंधळचे प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहचले आहे. दिल्लीच्या महापौर शेली ओबेरॉय यांनी स्थायी समिती निवडणुकीत एक मत अवैध असल्याचा निर्णय दिला होता. त्याविरोधात भाजपने दिल्लीच्या उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. शुक्रवारी या संबंधात महानगरपालिकेच्या सभागृहात दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झाली होती. काही नगरसेवक या हाणामारीत जखमी झाले होते. या संदर्भात दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी पोलिसांकडे परस्पविरोधी तक्रारी सादर केल्या आहेत. न्यायालयात कदाचित सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.