टॉप-10 मध्ये मुलींची चमक, 685 उमेदवारांची निवड ः मुलांमध्ये उत्कर्ष द्विवेदीची बाजी
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय लोकसेवा आयोगाने सोमवारी नागरी सेवा परीक्षा-2021 चा अंतिम निकाल जाहीर केला. मूळची बिजनौरमधील रहिवासी व सध्या दिल्लीत राहणाऱया श्रुती शर्मा हिने प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक अंकिता अगरवाल आणि तिसरा क्रमांक गामिनी सिंगला हिने पटकावला. तर चौथा क्रमांक ऐश्वर्या वर्मा हिला प्राप्त झाला. टॉप-10 रँकधारकांपैकी 4 मुलींचा सहभाग आहे. तर पाचव्या स्थानी उत्कर्ष द्विवेदी याची निवड झाली असून तो मुलांमध्ये पहिला आला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकाल यादीनुसार, 685 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली असून याशिवाय 80 उमेदवारांची प्रोव्हिजिनल (अस्थायी) म्हणून निवड करण्यात आली आहे. एकंदर उमेदवारांपैकी 180 आयएएस, 37 आयएफएस आणि 200 आयपीएस उत्तीर्ण झाले आहेत. तसेच सेन्ट्रल सर्व्हिस ग्रुप ‘ए’ साठी 242 आणि ग्रुप ‘बी’साठी 90 उमेदवार निवडले गेले आहेत. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची युपीएससीद्वारे तीन फेऱयांमधील कामगिरीच्या आधारावर निवड केली जाते. यामध्ये प्रिलिम्स परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे पार करावे लागतात.
युपीएससी-सीएसई प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली आणि परीक्षेचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली. याचा निकाल 17 मार्च 2022 रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर 5 एप्रिल ते 26 मे दरम्यान मुलाखती पार पडल्यानंतर सोमवारी या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे.
युपीएससीतील ‘टॉप-10’
प्रथम स्थान – श्रुती शर्मा
द्वितीय क्रमांक- अंकिता अगरवाल
तृतीय क्रमांक – गामिनी सिंगला
चौथे स्थान – ऐश्वर्या वर्मा
पाचवे स्थान – उत्कर्ष द्विवेदी
सहावे स्थान – यक्ष चौधरी
सातवे स्थान – सम्यक एस. जैन
आठवे स्थान – इशिता राठी
नववे स्थान – प्रीतम कुमार
दहावे स्थान – हरकिरत सिंग रंधावा