सांगली : पुणे, मिरज, लोंढा या रेल्वेच्या दुहेरीकरण, विद्युतीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. काही दिवसात हे काम पूर्ण होईल. दरम्यान या मार्गावर आणखी जादाच्या रेल्वेगाड्या सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. गेल्या दोन वर्षापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस व नव्याने सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेली बेळगाव पुणे इंटरसिटी या दोन गाड्या लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरीकातून होत आहे. तसेच मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महालक्ष्मी पाठोपाठ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सकाळी साडेसातपर्यंत कोल्हापूर, मिरज, सांगली याठिकाणी सुरू करण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.
हेही वाचा- देवरुख:ओझरे खुर्द येथे कोयत्या व विळ्याने वार; २ जण गंभीर जखमी
पुणे, मिरज, लोंढा यां रेल्वे मार्गावरील कोल्हापूर मिरज ते पुणे दरम्यानचे विद्युतीकरणाचे एकेरी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरून सध्या कोयनेसह काही एक्सप्रेस व मालगाड्या विजेवरील इंजिनाद्वारे सुरू करण्यात आल्या आहेत. विद्युतीकरणाचे काम गतीने सुरू असताना सांगली ते भिलवडी व पुण्याच्या दिशेला आणखी काही ठिकाणी दुहेरीकरणाचे काम बाकी आहे. येत्या दिवाळीपर्यंत यातील बरेचसे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जसजसे काम पूर्ण होईल तसतश्या विजेवरील गाड्या सोडण्यात येत आहेत.

