पशुपालकांची गैरसोय : दवाखान्यात आवश्यक सुविधा पुरवा
प्रतिनिधी /बेळगाव
महांतेशनगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांचा डॉक्टर नसल्याने पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः जनावरांसह कुत्र्या-मांजरांना आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याने पशुपालकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पशुसंगोपन खात्याने रिक्त जागा भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाच हजार जनावरांमागे एक पशुवैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र सद्य परिस्थिती पाहता पंधरा हजार जनावरांमागे एक पशुवैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे जनावरांना आरोग्याच्या सुविधा पुरविताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणी एका पशुवैद्यकीय अधिकाऱयांवर दोन-तीन दवाखान्यांची जबाबदारी दिल्याने अडचणी वाढल्या आहेत. वेळेत उपचार मिळत नसल्याने पशुपालकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यांतून डॉक्टरांची नियुक्ती करावी आणि सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.
शहरासह ग्रामीण भागात दुभत्या गायी-म्हशींबरोबर बैल, कुत्रा, शेळय़ा-मेंढय़ा, घोडा, गाढव, मांजर आदींचे संगोपन केले जाते. मात्र आजारी जनावरांना वेळेत उपचार मिळत नसल्याने खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. शहरांसह ग्रामीण भागात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे. त्यातच रिक्त असलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या जागा भरण्याकडे मागील काही वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अनेक दवाखान्यांतून जनावरांना सुविधा मिळेनाशा झाल्या आहेत.