बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीला निवेदन : सीमाबांधवांनी एकत्र येण्याची गरज, ग्रामस्थ-कार्यकर्त्यांची उपस्थिती
वार्ताहर /किणये
मराठीतून परिपत्रके द्या, या मागणीचे निवेदन बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीला बुधवारी देण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व युवा समितीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मराठीतून परिपत्रके मिळविण्यासाठी आता युवा वर्गातून अधिक प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सीमाभागातील नागरिकांना सरकारी कार्यालयातून मिळणारी परिपत्रके मराठीतून देण्यात यावीत. या मागणीसाठी ग्रामस्थांच्यावतीने गेले तीन-चार महिने आंदोलने, मोर्चा काढण्यात येत आहेत. मराठी भाषेतून कागदपत्रके मिळेपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही, असा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलनही दि. 8 ऑगस्ट रोजी छेडण्यात आले. आपल्या मातृभाषेसाठी भर पावसातही या दिवशी समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.
प्रत्येक ग्रामपंचायतीला निवेदन देणार
मराठीतून परिपत्रके मिळविण्यासाठीचे हे आंदोलन न थांबविता तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीला निवेदन देण्याचे आवाहन केले असून आम्ही त्यानुसार ग्रामीण भागातील ग्राम पंचायतींना निवेदन देणार आहोत, अशी माहिती तालुका म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी दिली. तसेच या मोहिमेला बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीला निवेदन देऊन सुरुवात करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
जाणीवपूर्वक प्रशासनाकडून दुर्लक्ष
सीमाभागात मराठी बहुभाषिक असल्याने इथल्या लोकांना सरकारी कार्यालयांमधून मराठी भाषेत परिपत्रके मिळायला हवी. मात्र, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक मराठीत कागदपत्रे देण्यात येत नाहीत. आपल्या मातृभाषेतून परिपत्रके मिळविण्यासाठी आता पुन्हा एकदा सीमाबांधवांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. या मोहिमेत तरुणांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी बेनकनहळ्ळी ग्रा. पं. चे पीडीओ गंगाधर नाईक व ग्रा. पं. अध्यक्षा प्रेमा हिरोजी यांच्याकडे निवेदन देऊन मराठीतून कागदपत्रे देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संतोष मंडलिक यांच्यासह महेश जुवेकर, आंबेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील, बेळगुंदी ग्रा. पं. सदस्य राजू किणयेकर, प्रसाद बोकडे, मदन पाटील, कांतेश चलवेटकर, बाळासाहेब चोपडे, डॉ. राजू पाटील, कल्लाप्पा देसूरकर, मोनेश्वर गरग आदींसह गावातील कार्यकर्ते व ग्रा. पं. चे 14 सदस्य उपस्थित होते, अशी माहिती संतोष मंडलिक यांनी दिली आहे.