आरोग्य विभागात काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे निवेदन
बेळगाव : कोरोना काळात आरोग्य विभागात काम केले. मात्र, त्यावेळचे दोन महिन्यांचे वेतन दिले गेले नाही. त्याचबरोबर आम्हाला कायमस्वरुपी कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जिवावर उदार होऊन काम केले असताना आम्हाला जाणूनबुजून डावलण्यात आले आहे, असा आरोप करत आरोग्य विभागातील या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. कोरोना काळात काम करण्यास कोणीच तयार नव्हते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काम केले आहे. त्यावेळी आम्हाला वेतनाबरोबरच भत्तादेखील दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, काम केलेले दोन महिन्यांचे वेतन नाहीच. आता आम्ही बेरोजगार आहोत. तेव्हा पंतप्रधान कौशल्य योजनेंतर्गत आम्हाला नोकरीमध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. केवळ आश्वासने देऊन आम्हाला बेरोजगार बनविल्याचा आरोपदेखील या कर्मचाऱ्यांनी केला आहे. तातडीने आमचे वेतन द्यावे, त्याचबरोबर काम द्यावे, अशी मागणी करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरोग्य विभागातील परिचारक आणि परिचारिका तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.