प्रतिनिधी /बेळगाव
नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणाच्या प्रवेशद्वारासमोर एका जुनाट वृक्षाची फांदी कोसळण्याच्या स्थितीत आहे. ऐन रहदारीच्या ठिकाणी हे झाड असल्यामुळे मोठा धोका उद्भवण्यापूर्वी वनविभाग व महानगरपालिकेने एकत्रितपणे ही धोकादायक फांदी बाजूला करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पावसाळय़ात नेहमीच ऐरणीवर येतो. धोकादायक वृक्ष कोसळल्यानंतर जीवितहानीसोबत वित्तहानीही मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे पावसाळय़ापूर्वीच धोकादायक वृक्षांची नोंद घेऊन ते तोडणे आवश्यक आहे. चार वर्षांपूर्वी वनविभाग, हेस्कॉम व महानगरपालिका अधिकाऱयांनी एकत्रित बसून धोकादायक वृक्ष व त्यांच्या फांद्यांची विभागवार माहिती घेतली होती. याच पद्धतीने यावषीही पावसाळय़ापूर्वी असा उपक्रम राबविणे गरजेचे होते. परंतु सर्वच विभागांच्या दुर्लक्षामुळे धोकादायक वृक्ष कोसळून हानी होत आहे.
केएलई रोडवर नेहमीच वर्दळ सुरू असते. केएफसी हॉटेलसमोरील एका वृक्षाची फांदी कोसळण्याच्या स्थितीत आहे. या झाडाखालून दररोज शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक ये-जा करीत असतात. तसेच वाहने झाडांखाली लावली जातात. ही फांदी कोसळल्यास मोठा अपघात घडू शकतो. तसेच वाहनांचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे याची दखल घेत संबंधित विभागांनी ही फांदी हटवावी, अशी मागणी होत आहे.