क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
अनेक राज्यांमध्ये क्रीडा व्यक्तींसाठी आरक्षण दिले जाते. ज्यात सरकारी नोकऱयांमध्ये दोन टक्के आरक्षण दिले जाते. गोव्यातील खेळाडूंना सरकारी नोकऱयांमध्ये दोन टक्के आरक्षण देण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गोव्यात राष्ट्रीय खेळांच्या आयोजनासाठी पायाभूत सुविधांचे 80 ते 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. राज्यात 17 वर्षाखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे सहयजमान करण्यासाठी राज्य सरकार क्रीडा सुविधांना अंतिम टच देत आहे. डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय खेळांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण होतील. सदर स्पर्धा गोव्यात होणार असून त्यासाठी आम्ही पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहोत. 80 ते 85 टक्के पायाभूत सुविधा तयार आहेत अशी माहिती मंत्री गावडे यांनी यावेळी दिली.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे 6 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंत ‘नॅशनल गेम्स’चे गोव्यात आयोजन करू शकता का अशाप्रकारचे पत्र लिहिले आहे. परंतु याबाबत आम्ही आमचा निर्णय सांगितला आहे. गोव्यात नॅशनल गेम्सची तयारी नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे असोसिएशनने गोव्याला पाच महिन्यांचा वेळ द्यावा. सध्या पावसाचे दिवस असल्याने उपलब्ध असलेल्या सुविधांना पुनरूज्जीवन देणे कठीण आहे. बऱयाचशा ठिकाणी साधनसुविधा निर्माण करणे गरजेचे आहे असे पत्र लिहिले असल्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.