मागणीसाठी खानापुरातून शेकडो शिक्षक आंदोलनात सहभागी
प्रतिनिधी /खानापूर
केंद्र सरकारने नव्या पेन्शन धोरणानुसार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन बंद केली आहे. यासाठी बेंगळूर येथील फ्रीडम पार्कवर कर्नाटकातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनीच पेन्शन योजना कायम करण्यात यावी, या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यात खानापूर तालुक्यातील शेकडो शिक्षक सहभागी झाले आहेत. हे आंदोलन गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. या आंदोलनात खानापूर तालुक्यातून शिक्षक कायम सहभागी होणार आहेत. सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
या आंदोलनाबाबत माहिती देताना शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चापगावकर म्हणाले, फक्त पाच वर्षे आमदार झाल्यानंतर लोकप्रतिनिधीना निवृत्तीनंतर मोठ्या प्रमाणात पेन्शन मिळते. तसेच त्यांच्या पश्चात कुटुंबीयांना देखील शासकीय योजनांचा लाभ मिळतो. आम्ही समाज घडवणाऱ्याना मात्र शासनाने निवृत्तीनंतरचे जीवन अत्यंत कष्टाचे केले आहे.
आमची पेन्शन रद्द केल्याने आमच्या निवृत्तीनंतर आमच्यावर संकट ओढवणार आहे. यासाठी शासनाने तातडीने याचा गांभीर्याने विचार करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा मागणीसाठी आम्ही बेंगळूर येथील फ्रीडम पार्कवर धरणे आंदोलन हाती घेतले आहे. आमच्या आंदोलनास राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून जोपर्यंत शासन आमची मागणी पूर्ण करणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसून वेळ पडल्यास आंदोलन उग्र करणार आहोत, असे सांगितले.
फ्रीडम पार्कवर आंदोलन
तालुक्यातून शेकडो शिक्षक या आंदोलनात आळीपाळीने सहभागी हात आहेत. फ्रीडम पार्कवर होत असलेल्या आंदोलनात राज्य नोकर संघाचे राज्य सेक्रेटरी कृष्णा कौंदलकर, एनजीओ खजिनदार जे. पी. पाटील, एनपीएस संघ अध्यक्ष रमेश कवळेकर, एनपीएस कार्यदर्शी जी. पी. केरीमठ, गौरव अध्यक्ष एस. वाय. पाटील, वन्नुरे पाटील, विठ्ठल बिळमरी, बसवराज नागलापूर, प्रकाश शेटन्नावर, गोविंद पाटील, प्रकाश मादार, वाय. एम. कुकडोळकर, विनायक कुंभार, ए. पी. काळे, संतोष चोपडे, बापू दळवी, किरण पाटील यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.