सार्व. बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी केली कामाची पाहणी
प्रतिनिधी/ शिरोडा
बोरी येथील मोडकळीच्या अवस्थेत असलेल्या जुन्या बोरी पुलाचे व त्याच्याच बाजूला असलेल्या जुन्या लोखंडी पाण्याच्या पाईपलाईनच्या पुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी काल बोरी येथे केली. सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत हे दोन्ही धोकादायक अवस्थेत असलेले पूल मोडून काढण्याच्या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. पूर्ण झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांच्यासह कार्यकारी अभियंता साधना बांदेकर, कनिष्ठ अभियंता दत्ता नाईक व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना मंत्री काब्राल यांनी बोरी येथील हे जुने पूल धोकादायक स्थितीत पाण्याच्या खाली व अर्धा भाग पाण्याच्या वर मोडकळी अवस्थेत उभे होते. ते पूर्णतः मोडून काढण्याचे काम बांधकाम खात्यातर्फे हाती घेण्यात आले होते. हे मोडून काढलेले पुलाचे लोखंडी अवशेष कंत्राटदारानेच परस्पर विक्री करून त्याच्यावर येणारा खर्च हा सरकारतर्फे देण्यात येणार असे, या कामाचे स्वरुप होते. अत्यंत धोकादायक स्थितीत असलेले हे काम कंत्राटदाराने चोख पूर्ण केले असल्याचे मंत्री काब्राल यांनी सांगितले. या कामामुळे जलमार्गावरून वाहतुक करणाऱया मच्छिमार होडय़ांना व मालवाहून बार्जना अपघाताचा धोका टळलेला आहे, असे त्यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे स्थानिक मच्छिमार व हा जलमार्गाचा वापर करणाऱया बार्जीसकडून या धोकादायक पुलामुळे अपघात घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याचेच गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे मंत्री काब्राल यांनी सांगितले.
गोव्यातील खाण उद्योग लवकरच सुरु होण्याचे शुभसंकेत असून खाण उद्योग सुरु झाल्यास पूर्ववत जलवाहतूक सुरु होणार आहे. व त्यावेळी हे काम उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. पोर्तुगीज काळात या बोरी जुन्या पूलची बांधणी करण्यात आली होती व त्यानंतर गोवा मुक्ती संग्रामाच्यावेळी ऑपरेशन विजय काळात पोर्तुगीजांतर्फे या पुलाची नासधूस करण्यात आली होती. 1963 साली या पुलाचे पुनःबांधकाम करण्यात आले होते. मात्र पुलाचे आयुष्य संपुष्टात आल्याने हा पूल मोडकळीस आला होता. पुलाच्या दोन्ही बाजूनी उभे असलेले पुरातन कमान पुरातत्त्व अवशेष म्हणून जतन करता येतील. त्यासाठी आपण पुरातन खात्यामार्फत हे स्थळ पर्यटन स्थळ विकसित करण्यावर संबंधित खात्यांच्या मंत्र्यांशी बोलणी करणार असल्याचेही काब्राल यांनी सांगितले. येत्या सोमवारी 16 जाने. रोजी कामाची अंतिम चाचणी करण्यात येणार असून त्यानंतरच पुढचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन बोरी पुलासंबंधी माहिती देताना नवीन बोरी पुलाचे काम सुरु करण्याचे सोपस्कर लवकरच हाती घेण्यात येणार आहे. नवीन समांतर पूल व मिसिंग लिंकच्या कामाचा भूसंपादन राष्ट्रीय महामार्ग ऍक्ट अंतर्गत होणार आहे. बायथाखोल बोरी ते लोटली मिसिंग लिंक पर्यंत भूसंपादनाचे काम सुरु होणार आहे. व त्यानंतर नवीन पुलाचे काम लवकरात लवकर हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.