सेवेत कायम करून वेतनात वाढ करण्याची मागणी
प्रतिनिधी /पणजी
कंत्राटाची मुदत संपलेल्या परिचारिकांनी कांपाल-पणजी येथील आरोग्य खात्याच्या कार्यालयावर काल सोमवारी मोर्चा काढून कंत्राटाची मुदत वाढवा, सेवेत कायम करून वेतनात वाढ करा, अशी मागणी केली. या मागण्यांसाठी त्यांनी कार्यालयासमोर निदर्शने केली. मागणीचे पत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना पाठवले आहे.
मोर्चेकरी परिचारिकांनी आरोग्य खात्याच्या संचालिका गीता काकोडकर यांची भेट घेतली आणि या प्रश्नावर त्यांच्याकडे बोलणी केली. काकोडकर यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांना दिले.
कंत्राटी सेवेत 250 परिचारिका
कंत्राटी सेवेत सुमारे 250 परिचारिका असून त्यांनी कोरोना महामारी संकट काळात 2 वर्षे काम केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु ते पाळण्यात आले नाही. कंत्राटाची मुदत संपल्यामुळे त्यांची सेवा ख्ंाडित झाली असून ती वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
कंत्राट वाढविण्याचे आश्वासन
पारिचारिकांच्या भरतीत त्यांना प्राधान्य देणार असे सांगण्यात आले होते. त्यानुसार सेवेत प्राधान्य मिळावे आणि नोकरीत कायम करावे अशी त्यांची मागणी आहे. त्यांचे कंत्राट वाढवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन संचालिका काकोडकर यांनी दिले आहे.