खासगी रूग्णालये हाऊसफुल्ल, कामथेतही अनेकांवर उपचार
चिपळूण प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये डेंग्यूचे रूग्ण सापडत आहेत. यामुळे खासगी रूग्णालये हाऊसफुल्ल झाली असून कामथे उपजिल्हा रूग्णालयातही अनेकांवर उपचार सुरू आहेत. असे असताना आरोग्य विभाग मात्र निद्रिस्त असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात ताप, सर्दी, खोकल्याचे अनेक रूग्ण सापडत आहेत. हे सर्व रूग्ण खासगी रूग्णालयांमध्ये उपचार घेऊन बरे होत आहेत. मात्र ज्यांना नियमित औषधांनी फरक पडत नाही असे रूग्ण रक्त, लघवीच्या चाचण्या करून घेत असल्याने त्यांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या विविध प्रकारच्या पेशी कमी होत असल्याने ते शहरातील मोठ्या रूग्णालयांमध्ये दाखल होऊन उपचार घेत आहेत. काही रूग्णांवर कामथे उपजिल्हा रूग्णालयातही उपचार सुरू असून काहींना घरी सोडण्यात आले आहे. अनेक रूग्ण तपासण्या न करता घरातच पपई, पपईच्या पानांचा रस, किवी फळे खाण्यासह सलाईन लावून घेत बरे होताना दिसत आहेत. त्यामुळे साथ मोठी असली तरी रूग्णांसह तितकीशी दिसून येत नाही. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता काही भागात 3 रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे त्या भागांमध्ये पाहणी करण्यात आली असून फवारणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र काही भागांमध्ये तापाचे रूग्ण असतानाही त्याची माहिती नसल्याने त्या भागात अद्याप पाहणी झाली नसल्याचे दिसत आहे.
आरोग्य विभाग निद्रिस्त
काही गावांमध्ये डेंग्यूचे रूग्ण सापडत असून ताप, सर्दी, खोकल्याचे अनेक रूग्णही आहेत. तरीही आरोग्य विभाग तितकीशी खबरदारी घेताना दिसत नसून मार्गदर्शन, तपासण्या व फवारणी करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डेंग्यूची साथ व तापाचे रूग्ण असताना आरोग्य विभाग इतका निद्रिस्त का, असा सवाल उपस्थित होत आहे.