पिछाडी भरुन काढत डेन्मार्क विजयी, कार्नेलियूसचे दुहेरी गोल
वृत्तसंस्था/ पॅरीस (फ्रान्स)
युफा नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या ए-वन गटातील सामन्यात डेन्मार्कने बलाढय़ आणि विद्यमान विजेत्या फ्रान्सला पराभवाचा धक्का देत विजयी सलामी दिली. डेन्मार्कने हा सामना 2-1 अशा गोलफरकाने जिंकला.
येथील स्टेड डी फ्रान्स फुटबॉल स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात करीम बेंझेमाने नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर फ्रान्सने डेन्मार्कवर आघाडी मिळविली होती. पण, त्यानंतर डेन्मार्कने पिछाडीवरून मुसंडी मारत फ्रान्सचे आव्हान संपुष्टात आणले. डेन्मार्कतर्फे अँड्रेस कॉर्नेलियूसने दोन गोल नोंदविले.
सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर डेन्मार्कच्या खेळाडूंनी आक्रमक चाल करत गोल पोस्टपर्यंत मुसंडी मारली. पण, फ्रान्सच्या बचावफळीने डेन्मार्कला खाते उघडण्यापासून रोखले. त्यामुळे पहिल्या पाच मिनिटाच्या कालावधीत डेन्मार्कने गोल करण्याची संधी गमविली. फ्रान्स संघातील कायलेन एम्बापेने डेन्मार्कच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली. मात्र, त्याचा गोलपोस्टच्या दिशेने मारलेला फटका हुकला.
खेळाच्या पूर्वार्धात डेन्मार्कच्या खेळाडूंनी फ्रान्सच्या एम्बापे आणि करीम बेंझेमावर नियंत्रण राखले. मात्र फ्रान्सने सामन्याच्या मध्यंतरापूर्वी एम्बांपेच्या जागी बदली खेळाडू ख्रिस्टोफरला मैदानात उतरविले. त्यानंतर उजव्या बगलेतून मिळालेल्या पासवर बेझेंमाने डेन्मार्कच्या पेनल्टी एरियात धडक मारत त्यांच्या गोलरक्षकाला हुकालवणी देत फ्रान्सचे खाते उघडले. ऍड्रेस कॉर्नेलियूसने सामन्याच्या उत्तरार्धातील पहिल्या 10 मिनिटात पहिला गोल नोंदवून डेन्मार्कला बरोबरी साधून दिली. या सामन्यातील दुसरा आणि निर्णायक गोल 86 व्या मिनिटाला अँड्रेस कॉर्नेलियूसने नोंदवून फ्रान्सचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले.