वृत्तसंस्था/ बेंगळूर
बेल्जियममध्ये होणाऱ्या एफआयएच हॉकी प्रो लीग लढतीसाठी भारताचे पुरुष व महिला हॉकी संघ बुधवारी ब्रुसेल्सकडे रवाना झाले. 11 व 12 जून रोजी यजमान बेल्जियमविरुद्ध या लढती होणार आहेत.
भारतीय महिला संघ प्रो लीग गुणतक्त्यात तिसऱया स्थानावर असून 8 सामन्यात त्यांनी 22 गुण मिळविले आहेत. अर्जेन्टिना सर्वाधिक 38 गुणांसह पहिल्या, 26 गुणांसह नेदरलँड्स दुसऱया स्थानावर आहेत. मात्र भारताने अर्जेन्टिना व नेदरलँड्स यांच्यापेक्षा कमी सामने खेळले आहेत. भारताने उर्वरित लढती जिंकल्या तर अग्रस्थानी झेप घेण्याची त्यांना चांगली संधी आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघ प्रो लीगमध्ये दुसऱया स्थानावर आहे. अव्वल स्थानी असणाऱया नेदरलँड्सपेक्षा ते फक्त तीन गुणांनी मागे आहेत. ‘काही अव्वल संघांविरुद्ध त्यांच्याच देशात खेळण्याची संधी मिळाली याचा आम्हाला खूप आनंद वाटतो,’ असे भारतीय कर्णधार अमित रोहिदास म्हणाला. महिला संघाची कर्णधार सवितानेही अशाच भावना व्यक्त केल्या.