कारवार जनशक्ती मंचतर्फे मागणीचे निवेदन : औषधाऐवजी चोरटी दारू वाहतूक
प्रतिनिधी / कारवार
गोवा बनावटीच्या त्या चोरटय़ा वाहतुकीची गांभीर्याने दखल घेऊन कारवार तालुक्यातील कर्नाटक-गोवा सीमेवरील माजाळी तपासणी नाक्यावर निमलष्करी दलाचे जवान तैनात करावेत, अशी मागणी येथील जनशक्ती मंचचे अध्यक्ष माधव नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे केली आहे.
औषधे वाहतुकीच्या नावाखाली गोव्याहून कंटेनरमधून कारवार-अंकोलामार्गे हैद्राबादकडे वाहतूक करण्यात येत असलेली सुमारे साडे सत्तावीस लाख रुपयांची दारू सोमवारी येथून जवळच्या अरगा-बिणगाजवळ जप्त करण्यात आली होती.
निवेदनात म्हटले आहे की, गोवा बनावटीच्या दारुची तालुक्यातील माजाळी किंवा जोयडा तालुक्यातील अनमोड तपासणी नाक्यावरून चोरटी वाहतूक करणे ही काय नवीन बाब नाही. तथापि सोमवारच्या चोरटय़ा वाहतुकीचे प्रकरण अतिशय भिन्न आहे. कंटेनर कारवार तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी माजाळी तपासणी नाक्याजवळच्या पोळे येथील विविध तपासणी यंत्रणांना सामोरे जावे लागते. त्यानंतर कर्नाटक सरकारच्या अबकारी आणि पोलिस यंत्रणेसह सदाशिवगड आणि येथील लंडन ब्रिजजवळच्या पोलिस आऊटपोस्टना सामोरे जावे लागते. तरीसुद्धा कंटेनरमध्ये औषधांच्या नावाखाली वाहतूक करण्यात येत असलेले घबाड कसे काय लक्षात आले नाही, हा चौकशीचा विषय आहे. जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. सुमन पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रेमनगौडा पाटील यांनी कारवाई करून दारू जप्त केली. हे खरे असले तरी वेगवेगळय़ा तपासणी नाक्यांवरील कर्मचाऱयांचे या प्रकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे, असे स्पष्ट करून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
स्फोटकांची वाहतूक होणार नाही कशावरून?
गोव्यालगतच्या कारवार तालुक्यात सीबर्ड नाविक प्रकल्प कारवार वाणिज्य बंदर, कैगा अणुऊर्जा प्रकल्प, काळी नदीवरील विविध जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहेत. आमचा देश घातपाती कारवायांचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत प्रकल्पस्थळी आरडीएक्ससारख्या स्फोटकांची चोरटी वाहतूक करून देशाची हानी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षिततेमध्ये आढळून आलेला दोष म्हणून हाताळावे, असे नाईक यांनी म्हटले आहे. यावेळी रामा नाईक, बाबू शेख, सी. एन. नाईक, सुरेश नाईक, रोहिदास बानावळी, राजीव नाईक, सुरेश कुमकर उपस्थित होते.
आधुनिक उपकरणे उपलब्ध करा
चोरटय़ा दारू वाहतुकीच्या नावाखाली अन्य विनाशकारी वस्तूंची वाहतूक होण्यापूर्वी माजाळी नाक्यावर लष्कर किंवा निमलष्करी जवान तैनात करावेत. शिवाय तपासणी नाक्यावरील कर्मचाऱयांना आधुनिक तपास उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी पुढे माधव नाईक यांनी केली आहे.