ऑनलाईन टीम/तरुण भरत
वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन केल्यास सर्वसामान्यांना वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक करावाईला सामोरे जावे लागते. काही वेळेला कारवाई होताना नागरिक नेते मंडळींना फोन करतात. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, पोलिसांना, वाहतूक पोलिसांना सहकार्य करा, कायद्याने घालून दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवू नका, स्वत:सोबत दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नका, असे अनेक सल्ले नेतेमंडळी देतात. परंतु हेच नेते मंडळी (political leaders) जेंव्हा नियम मोडतात तेव्हा त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागते हे समोर आले आहे.
वाहतुकीचे नियम मोडल्यावर पोलीस आणि वाहन चालक यांच्यात होणारे वाद कमी करण्यासाठी सरकारने इ-चलन सुरू केले. त्यामुळे वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधिताचा फोटो काढून त्याच्यावर ऑनलाइन दंडात्मक कारवाई केली जाते. आता सर्वसामान्यांप्रमाणेच राजकीय नेतेही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात अग्रेसर असल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांवर वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अजित पवार आघाडीवर आहेत.
वाहतूक नियम तोडण्यात सर्वाधिक आघाडीवर महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आहेत. अजित पवारांच्या दोन्ही वाहनांवर २७,८०० रुपयांचा दंड असून, त्यांनी ही सर्व रक्कम नुकताच ऑनलाईन भरली. सर्वाधिक १४,२०० रुपये दंड भाजप आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या वाहनावर आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip valse-patil) यांना ५,२०० रुपये, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ६०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.