राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांची ग्वाही
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामाला गती देण्यासाठी शासकीय तसेच व्यक्तीगत स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये अध्यासनाच्या कामकाजाची विशेषतः अडचणींची आणि भविष्यात करता येऊ शकणाऱया विविध विधायक कामांची माहिती घेतली. देसाई यांच्या हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
हे ही वाचा : विद्यापीठात ३०० परदेशी वाणांच्या झाडांचे नुकसान
मंत्री देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीमधील योगदान अतुलनीय आहे. नव्या पिढीला त्यांचे उत्तुंग कार्य माहिती होण्याच्या दृष्टीने या अध्यासनाच्या माध्यमातून विविध उपक्रमांमधून प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी मदत करण्यासाठी शासन तत्पर आहे. या अध्यासनासाठी मंजूर केलेला तीन कोटी रुपयांमधील उर्वरित अडीच कोटी रुपयांचा निधी तातडीने विद्यापीठाला दिला जाईल. शासनाव्यतिरिक्त विविध उद्योग-व्यवसायांच्या सामाजिक दायित्व निधी देण्याचा प्रयत्न आहे. विद्यापीठाच्या वस्तुसंग्रहालयात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणारे स्वतंत्र कलादालन निर्माण करावे. त्यासाठीही सर्वोतोपरी मदत केली जाईल. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधीची तरतूद करण्याची सूचना मंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिली. अध्यासनाच्या प्रगतीसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते मंत्री देसाई यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथभेट देऊन सत्कार केला. अध्यासनाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी अध्यासनाची माहिती दिली. यावेळी माजी आमदार सुजीत मिणचेकर, शिवराज देसाई, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उच्च व तंत्रशिक्षण कोल्हापूर विभागाचे उपसंचालक हेमंत कठरे, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख, डॉ. भारती पाटील, डॉ. अरुण भोसले, व्ही. जी. पानस्कर आदी उपस्थित होते.