वाहनधारकांना करावा लागतोय अन्य मार्गाचा अवंलब
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर रोडवर जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र काम करताना कोणतीच दक्षता घेतली जात नाही. ऐन पावसाळय़ात मुख्य रस्त्यावर खोदाईचे काम करण्यात येत असल्याने वाहनधारकांना अडचणीचे बनले आहे. मंगळवारी आरपीडी चौकात खोदाई करण्यात आल्याने देशमुख रोडवरील वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांना अन्य मार्गाचा अवलंब करावा लागला. अयोग्य नियोजनामुळे नागरिकांना फटका बसला आहे.
दैनंदिन सुविधा खंडित न करता विकासकामे राबविण्याची गरज आहे. पण याकडे दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार एल ऍण्ड टी कंपनीने चालविला असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या घालताना खबरदारी घेण्यात आली नसल्याने एल ऍण्ड टी आणि महापालिकेच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तिसरे रेल्वे गेट परिसरात जलकुंभ उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अनगोळ नाक्मयापासून खानापूर रोडवर जलवाहिनी घालण्याचे काम करण्यात येत आहे. पण यामुळे येथील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात येत असल्याने येथील निम्मा रस्ता बंद करण्यात आला आहे. पावसाळय़ात सदर कामे करण्यात येत असल्याने ये-जा करणे मुश्किल बनले आहे. यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
मंगळवारी आरपीडी कॉर्नर परिसरात जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने देशमुख रोडकडे जाणारा रस्ता बंद झाला होता. परिणामी वाहतुकीस हा रस्ता बंद झाल्याने वाहनधारकांना ये-जा करणे मुश्किल बनले. खोदाई करण्यात येत असल्याने मुख्य रस्त्यावर माती पसरत आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडचण ठरत आहे. खोदण्यात आलेल्या रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत देशमुख रोडमार्गे ये-जा करणाऱया वाहनधारकांना अडचणींना सामना करावा लागणार आहे.