केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन. म्हापसा येथे ओबीसी महासभेचे अध्यक्ष शशिकांत घाडी यांचा सत्कार. ओबीसी महासभेतर्फे शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार. शशिकांत घाडी यांची घोषणा.
डिचोली/प्रतिनिधी
समाजाच्या कामासाठी पेटून उठलेल्या माणसाच्या पाठीवर कौतुकाची थाप बसल्यास त्याचे कार्य अधिक बहरते. जन्म कुठे व कोणत्या जाती समाजात होणार हे आपल्या हातात नाही. परंतु ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे नाव उज्वल करण्यासाठी आपले योगदान महत्त्वाचे आहे. समाजात आपल्या कार्यातून उंची गाठण्यासाठी प्रत्येकाने झटताना येणाऱया पिढीला कशाप्रकारे सुशिक्षित आणि सुसंस्कारीत करणार यावर भर देत ओबीसी समाजातील लोकांची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कार्य अपेक्षित आहे. संघटीत राहून काम करणार तेव्हाच आपल्या समाजाचा आणि ओबीसीचाही उध्दार होणार, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
अखिल भारतीय ओबीसी महासभा गोवा राज्य, हितचिंतक, मित्रपरिवार व कुटुबियांतर्फे म्हापसा येथील श्री बोडगेश्वर देवस्थान सभागृहात आयोजित ओबीसी महासभेचे अध्यक्ष शशिकांत घाडी यांचा वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार सोहळय़ात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, ओबीसी कमिशनचे अध्यक्ष अँड. मनोहर आडपईकर, सत्कारमूर्ती शशिकांत घाडी, सौ. संध्या घाडी, म्हापसाच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, या आयोजन समितीचे अध्यक्ष संतोष आखाडकर, खजिनदार विठोबा घाडी, महिला ओबीसी अध्यक्षा सपना मापारी तसेच विविध राज्यतील ओबीसी समाजाचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
ओबीसीसाठी शशिकांत घाडी यांचे कार्य कौतुकास्पद
समाजात आपल्या योगदानातून समाज पुढे येऊ शकतो हा विचार करून प्रत्येकाने कार्य केल्यास समाज वर येण्यास वेळ लागणार नाही. ओबीसीमध्ये अनेक समाज आहेत, परंतु त्यांची सांगड घालून सर्वांना संघटीत करून काम झाल्यास समाज पुढे येण्यास वेळ लागणार नाही. हे काम शशिकांत घाडी उत्कृष्टपणे करीत आहेत. या कार्यात सर्व समाजाच्या बांधवांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. असेही यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले.
शशिकांत घाडी हे एक प्रेरणास्रोत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट समाजासाठी सदैव
झटणाऱया शशिकांत घाडी यां?नी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आराम न करता समाजात ओबीसीला जागृत करून न्याय हक्कासाठी स्विकारलेली जबाबदारी हि अतुलनीय आहे. ओबीसीसाठी त्यांनी हा व्रत स्विकारला असून त्यात ते यशस्वी होणार आणि ओबीसी समाजालाही वेगळी उंची लाभणार आहे. शशिकांत घाडी हे एक प्रेरणास्रोत असून त्यांचे कार्यच प्रेरणादायी आहे, असे आपल्या भाषणात म्हटले.
प्रत्येक समाजाने आपल्या समाजासाठी योगदान दिल्यास ओबीसीची प्रगती
ओबीसी कमिशनचे अध्यक्ष अँड. मनोहर आडपईकर यांनी आपल्या भाषणात, बहुजन समाजासाठी शशिकांत घाडी यांच्या अंगात असलेली तळमळ त्यांना स्वस्थ बसायला देत नाही. म्हणूनच घाडी यांनी ओबीसी महासभेतर्फे आपल्या कार्यची व्याप्ती वाढवली आहे. गोवा राज्यात 52 टक्के ओबीसी समाज असून या राज्यात ओबीसीसाठी केवळ 27 टक्के आरक्षण आहे. हि टक्केवारी वाढविण्यासाठी या महासभेतर्फे कार्य होणे आवश्यक आहे. प्रत्येक समाजाने आपले कार्य चांगल्याप्रकारे केल्यास राज्य आणि देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. हेच ध्येय मनाशी बाळगून प्रत्येक ओबीसी बांधवाने समाज उन्नतीसाठी कार्य करावे, असे आवाहन केले.
(ँर्दे) ओबीसी महासभेतर्फे लवकरच शैक्षणिक क्षेत्रात काम – शशिकांत घाडी
ओबीसी समाजासाठी आपल्याकडून सुरू असलेले कार्य हे सर्वांच्या सथीने होत आहे. समाजासाठी काहीतरी करणार हा ध्यास घेऊन लहानपणापासून आपण भरपूर मेहनत घेतली, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण आणि नंतर काम करून स्वतःला तयार केले. याच मेहनत आणि परिस्थितीच्या अनुभवातून ओबीसी महासभेचा एक ट्रस्ट तयार करणार असून गरीब होतकरू मुलांना या ट्रस्टमार्फत शिक्षण देण्याचे काम करणार. शैक्षणिक क्षेत्रात या महासभेतर्फे कार्य करण्यासाठी आपण प्रारंभ लवकरच करणार आहे. या कार्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अशी घोषणा यावेळी सत्कारमूर्ती शशिकांत घाडी यांनी केली.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून शशिकांत घाडी यांचा सत्कार करण्यात आला. सौ. संध्या घाडी यांची सुहासिनी महिलांकडून ओटी भरण्यात आली.
प्रारंभी ज्योतीबा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबिरीस मान्यवरांच्या पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात झाली.
स्वागत आयोजन समितीचे अध्यक्ष संतोष आखाडकर यांनी केले. उल्हास परब, डॉ. प्रकाश वजरीकर यांनी आपले विचार मांडले. अनिल केरकर यांनी मानपत्र वाचन केले. तर आभार महेश आमोणकर यां?नी मानले.