ऑनलाईन टीम/तरुण भारत
विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) हे नाराज असून ते ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून आता पर्यंत तरी यश आलेलं नाही. एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असून ते ली-मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे आज सकाळी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे दिवसभरात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंसह २५ आमदार उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असून ते नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदें १३ आमदारांसह सुरतमध्ये ली-मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. तर हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांकडून मोठा पोलीस फाैजफ़ाटा तैनात केला आहे. तसेच गुजरात भाजपचे नेते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे बोलले जात असताना महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे तात्काळ आज सकाळी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे फडणवीस काय खेळी करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.