निपाणी बाजारातील परिस्थिती : दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरच, दर कमी होण्याची शक्यता
प्रतिनिधी /निपाणी
येथील आंबा मार्केटमध्ये देवगड हापूससह कर्नाटकातील तुमकूर व धारवाड येथील आंबा घाऊक बाजारात दाखल झाला आहे. पण सध्या आंब्याचा दर तेजीतच आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दर आवाक्यात येण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. येत्या काळात आंब्याची दरवाढ व घसरण याविषयी कोणताच अंदाज बांधणे कठीण असल्याची माहिती व्यापाऱयांनी दिली आहे.
आंबा हा फळांचा राजा मानला जातो. गेल्या दोन महिन्यापासून निपाणी घाऊक बाजारपेठेत आंब्याची आवक होत आहे. सुरुवातीला देवगड हापूस आंब्याचा दर 3 हजार रुपये प्रतिडझन होता. सध्या त्या दरात घसरण झाली आहे. सध्या देवगड हापूस आंब्याचा दर प्रति डझन 400 ते 800 रुपये इतका आहे. तर कर्नाटक तुमकूर व धारवाड येथील आंबा शनिवारी घाऊक बाजारपेठेत दाखल झाला आहे. या आंब्याचा दर प्रतिडझन 300 ते 400 रुपये इतका आहे.
सध्या अनेक ठिकाणी वळीव पावसाची हजेरी लागत असल्याने त्याचा आंबा उत्पादनावर परिणाम होत आहे. परिणामी आंब्याचा दर तेजीत आहे. किमान यापुढील 2 ते 3 आठवडय़ानंतर आंबा दर कमी होण्याची शक्मयता व्यापारी वर्गातून वर्तवली जात आहे. सध्या आंबा दर तेजीत असून देखील निपाणी येथे चिकोडी, खडकलाट, संकेश्वर, रायबाग, कागल आदी परिसरातून व्यापारी खरेदीसाठी येत आहेत. निपाणी शहरात कोकण भागातून हापूस आंब्याची आवक होते. तोतापुरी व पायरी आंब्याच्या खरेदीला पसंती मिळते. पण त्या आंब्याच्या आवकेत अद्याप घट आहे.