इस्रायलच्या सैन्याचा तिसरा डोळा
इस्रायलच्या युद्ध उपकरण निर्मात्या कंपनी जागतिक समुदायाला चकित करत असतात. इस्रायलच्या कॅमेरो-टेक कंपनीने जेवर 1000 नावाचे छायाचित्र काढणारे एक अत्याधुनिक उपकरण तयार केले असून ते भिंतीपलिकडील दृश्यही टिपू शकते. या उपकरणाने सर्व प्रकारची परीक्षणं पूर्ण केली आहेत.
जेवर 1000 अनेक संस्थांसाठी एक शक्तिशाली उपकरण ठरणार आहे. हे आर्टिफिशियल इंटेलिजेस आधारित लाइव्ह टार्गेट ट्रकिंग सिस्टीमने सुसज्ज आहे. यात स्वतःचे एक 3डी ‘सेंस थ्रू द वॉल’ तंत्रज्ञान सामील आहे. या तंत्रज्ञानाद्वारे भिंतीपलिकडील माणूस आणि स्थिर वस्तूंच्या अस्तित्वाचा थांगपत्ता लावला जाऊ शकतो.
भिंतीपलिकडे एखादे लक्ष्य बसलेले, उभे किंवा झोपलेले असल्यास या तंत्रज्ञानाद्वारे जिवंत शरीराच्या अवयवांच्या माहितीसह उच्च दर्जाची छायाचित्रे मिळतात. भिंतीपलिकडे एखादे मूल आहे का प्रौढ व्यक्ती का प्राणी आहे हे या उपकरणाद्वारे समजू शकते. अशाप्रकारच्या माहितीमुळे योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
संवेदनशील स्थितीत उपयुक्त
जेवर 1000 उपकरण सैन्य, संरक्षण दलं, शोधमोहीम, इंटेलिजेन्स युनिट इत्यादींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याचा शहरातील संकट आणि नैसर्गिक आपत्तीप्रसंगी मोठा वापर केला जाऊ शकतो. या उपकरणाचे संचालन एक व्यक्ती देखील करू शकतो. या उपकरणात एक 10.1 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे.