वृत्तसंस्था/ ला नुसिया (स्पेन)
आयबीएच्या येथे सुरू असलेल्या युवा पुरुष आणि महिलांच्या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या देविका घोरपडे आणि प्रिती दाहिया यांनी महिलांच्या विभागातील विविध वजनगटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
महिलांच्या 52 किलो वजनगटात पुण्याच्या देविका घोरपडेने आयर्लंडच्या मार्गारेट लॅम्बेचा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. सुरुवातीपासूनच या लढतीत देविकाने आपल्या जबरदस्त ठोशांच्या जोरावर मार्गारेटची दमछाक केली. या लढतीतील तिसऱया फेरीतच पंचांनी देविकाला विजयी म्हणून घोषित केले. महिलांच्या 57 किलो वजनगटात हरियाणाच्या प्रिती दाहियाने फिनलँडच्या बेनेडिक्टा मिकेनिनवर एकतर्फी विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मात्र, पुरुषांच्या विभागात भारताच्या मेहक शर्मा (66 किलो गटात), साहिल चव्हाण (71 किलो गटात) आणि भरत जून (92 किलो गटात) यांना प्रतिस्पर्ध्यांकडून हार पत्करावी लागली. स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या पाच महिलांसह एकूण दहा स्पर्धकांनी विविध वजनगटात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. महिलांच्या 60 किलो गटात टी. कुंजाराणीदेवी, 70 किलो गटात लाशू यादव, 54 किलो गटात ग्रिविया देवी, 63 किलो गटात रविना, 48 किलो गटात भावना शर्मा, पुरुषांच्या विभागात वंशज, 63.5 किलो गटात दीपक, 75 किलो गटात मोहित, 86 किलो गटात विश्वनाथ सुरेश, 48 किलो गटात आणि आशिष 54 किलो गटात यांनी पुढील फेरीत प्रवेश मिळविला आहे.