शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात भाविकांची गर्दी
प्रतिनिधी / बेळगाव
शिवबसवनगर येथील श्री जोतिबा मंदिरामध्ये गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चैत्र यात्रोत्सवानिमित्त या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांनी मोठय़ा संख्येने या प्रसादाचा लाभ घेतला. मंदिराच्या ट्रस्टींनी तसेच इतर पदाधिकाऱयांनी अत्यंत नियोजनबद्धरित्या प्रसादाचे वितरण केले. त्यामुळे भक्तांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शिवबसवनगर येथील श्री जोतिबा मंदिरामध्ये चैत्र यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले होते. शनिवार दि. 16 रोजी पहाटे 6 वाजता अभिषेक तर रात्री 8 वाजता महाआरती झाली होती. या मंदिराची उभारणी करण्यासाठी चव्हाट गल्ली येथील विविध संघटनांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. जवळपास अजूनही 40 टक्के काम शिल्लक असून त्या कामाला मदतीची गरज आहे. तेंव्हा भक्तांनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबा मंदिराला दरवषीप्रमाणे भक्त सासनकाठी घेऊन पायी चालत गेले होते. सासनकाठीचे आगमन गुरुवारी सकाळी जोतिबा मंदिर परिसरात झाले. त्यावेळी त्यांचे भव्य स्वागत व आरती करण्यात आली. त्यानंतर श्री जोतिबा मंदिरात महाआरती झाल्यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसाद वितरणाला सुरुवात करण्यात आली.
शहरासह परिसर आणि ग्रामीण भागांतून मोठय़ा संख्येने भक्त दाखल झाले होते. जवळपास 10 ते 12 हजार भाविकांनी हजेरी लावली. भक्तांनी श्री जोतिबा मंदिरामध्ये दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारी 4 पर्यंत महाप्रसादासाठी मोठी गर्दी झाली होती. उन असल्याने या परिसरात भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली होती. भक्तांना कोणताही त्रास होवू नये याची खबरदारी मंदिरच्या सर्वच पदाधिकाऱयांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतली होती.