20 लाखांचा दंड ः तपास अधिकाऱयांना 3-3 लाखांचा दंड, प्रशिक्षण प्रमुख निलंबित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) शनिवारी एअर एशियाला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला. 23 ते 25 जानेवारी दरम्यान आठ अधिकाऱयांनी एअर एशियाची तपासणी केली होती. तपासादरम्यान एअर एशियाचे वैमानिक काही अनिवार्य सूचनांचे पालन करत नसल्याचे दिसून आले होते. सदर पायलटना वैमानिक प्राविण्यता चाचणीदरम्यान नियमांची माहिती देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीवरील कारवाईसोबतच एअर एशियाच्या आठ तपास अधिकाऱयांना त्यांचे कर्तव्य योग्यप्रकारे न बजावल्याने प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच एअर एशियाच्या प्रशिक्षण प्रमुखाला 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
डीजीसीएने एअर एशियाचे व्यवस्थापक, प्रशिक्षण प्रमुख आणि सर्व जबाबदार अधिकाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर नोटिशीला लेखी उत्तर मागितले आहे. यापूर्वी डीजीसीएने एअर विस्ताराला 70 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. एअर विस्ताराने ईशान्य भारतातील कमी सेवा असलेल्या प्रदेशात कमीत कमी उड्डाणे चालवली. डीजीसीएने हे नियमांचे उल्लंघन मानत दंड ठोठावला होता. त्यापूर्वी 9 जानेवारी रोजी गो फर्स्ट एअरलाईनला 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. गो फर्स्टच्या विमानाने 55 प्रवाशांना बेंगळूरमध्ये सोडूनच दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले होते.